३ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कठुआ जिल्ह्यात विशेष कारवाई करत हाजी लतीफ या संशयित दहशतवादी मदतनीसाला अटक केली आहे. आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी राज्यभर सतर्कता वाढवली असून ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
माहितीनुसार, हाजी लतीफ गेली दोन दशके पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांसाठी स्थानिक नेटवर्क म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास मदत करणे, त्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांच्या कटात सहकार्य केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान लतीफने आतापर्यंत १२ पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी मदत केल्याचे समोर आले आहे. तसेच, सियालकोट सेक्टरमधून भारतात प्रवेश केल्यानंतर जैश-ए-मोहम्मदच्या वरिष्ठ कमांडरांनी त्याची भेट घेतल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे. याशिवाय, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्याचे अनेक वर्षांपासून संपर्क असल्याचेही तपासात उघड झाले आहे. सीमापार घुसखोरीचे नियोजन आणि दहशतवादी कारवायांसाठी आवश्यक मदत पुरवण्यात तो सक्रिय असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
देशातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतात. त्यामुळे यंदाही यात्रेपूर्वी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्यात येत आहे. यात्रेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या पहलगाम आणि बाल्टाल या दोन्ही मार्गांवर, तात्पुरत्या तळांवर, ट्रान्झिट कॅम्प आणि इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दलांकडून मॉक ड्रिल सुरू करण्यात आले आहेत. या सरावात सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरी प्रशासन सहभागी झाले आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय, दळणवळण व्यवस्था, बचावकार्य, जखमींचे स्थलांतर, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय मदतीची तयारी यांची चाचणी या सरावातून घेतली जात आहे.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन टायगर’; सचिन अहिर पण आले शिवसेनेत
प्रचंड लाटा, जोरदार वाऱ्यांच्या तडाख्यात अडकली बोट, ६ मच्छिमार वाचले
पाकिस्तानला FATFच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आणण्यासाठी भारत सज्ज
“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा
यंदाची ५७ दिवसांची श्री अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार असून अनंतनाग जिल्ह्यातील ४८ किलोमीटर लांबीच्या पारंपरिक पहलगाम मार्गाने तसेच गांदरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटरच्या बाल्टाल मार्गाने भाविकांना दर्शनासाठी जाता येणार आहे. ही यात्रा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविक पवित्र अमरनाथ गुहेत दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यात्रेच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून, हाजी लतीफच्या अटकेकडे सुरक्षा यंत्रणांच्या महत्त्वाच्या यशस्वी कारवाई म्हणून पाहिले जात आहे.







