कर्नाटकातील मंगळुरू किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात अडचणीत सापडलेल्या एका मासेमारी नौकेवरील सहा मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) धाडसी बचाव मोहीम राबवत सुरक्षित बाहेर काढले. खराब हवामान, उंच लाटा, जोरदार वारे आणि कमी दृश्यमानता अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली. तटरक्षक दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास भारतीय तटरक्षक जहाज ICGS Sachet ला व्हीएचएफ (VHF) रेडिओद्वारे आपत्कालीन संदेश प्राप्त झाला. ‘मंजू माथा’ या भारतीय मासेमारी नौकेने सुरतकल किनाऱ्यापासून सुमारे ३३ नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती देत मदतीची विनंती केली होती. नौकेच्या तळाला (Hull) नुकसान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आत शिरत होते आणि नौका बुडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यावरील सहाही मच्छीमारांचे जीव धोक्यात आले होते.
संदेश मिळताच ICGS Sachet ला तातडीने मदतीसाठी वळविण्यात आले. अवघ्या ९० मिनिटांत जहाज घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यावेळी समुद्रात प्रचंड लाटा, जोरदार वारे, कमी दृश्यमानता आणि अंधार पडण्यास सुरुवात झाल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले होते. तरीही तटरक्षक दलाच्या प्रशिक्षित जवानांनी अत्यंत कौशल्याने संपूर्ण मोहीम पार पाडली.
Swift #SearchAndRescue by @IndiaCoastGuard Ship #Sachet off Mangaluru, saved six lives. After IFB Manju Matha suffered hull damage and flooding in rough seas on 29 Jun 26, all survivors were rescued using remote-operated lifebuoys.
Survivors are being brought to #NewMangalore… pic.twitter.com/5UcZKMrY0F
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) June 30, 2026
हे ही वाचा:
पाकिस्तानला FATFच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आणण्यासाठी भारत सज्ज
“मोदी झोपत नाहीत”; राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितला ट्रम्प यांचा किस्सा
जून महिन्यात मंदावलेला मान्सून वेग धरणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
आयुष मलिक बनला होता मोहम्मद अली; स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला
बचाव मोहिमेदरम्यान तटरक्षक दलाने रिमोट-ऑपरेटेड लाइफबॉय (Remote-operated Lifebuoys) या आधुनिक उपकरणांचा वापर केला. खराब हवामानातही प्रभावीपणे काम करणाऱ्या या उपकरणांच्या मदतीने समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यात यश आले. सुमारे सायंकाळी ६ वाजेपर्यंत सहाही मच्छीमारांना कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे तटरक्षक जहाजावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यू मंगळुरू बंदरात आणून पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.







