केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले की १ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये १०० टक्के भारतीय निर्यातीवर शून्य शुल्क (झिरो ड्युटी) लागू होणार असून त्यामुळे श्रमप्रधान उद्योगांना मोठा फायदा होईल. यामुळे अनेक क्षेत्रांसाठी नव्या संधी खुल्या होतील. गोयल पुढे म्हणाले की, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅग्रीमेंट (CECA) साठी भारत अनेक देशांशी चर्चा करत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारताची आर्थिक भागीदारी वाढत आहे आणि हे ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त गोयल म्हणाले की, “आपण अशा भागीदारीचा उत्सव साजरा करत आहोत जिने हेतूंना संधींमध्ये रूपांतरित केले आहे.” एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना त्यांनी लिहिले, “एकत्र येऊन भारत आणि ऑस्ट्रेलिया सामायिक समृद्धी आणि विश्वासार्ह व्यापाराचे भविष्य घडवत आहेत.” गोयल यांच्या मते, गेल्या तीन वर्षांत या करारामुळे निर्यातीमध्ये सातत्याने वाढ, बाजारपेठेत अधिक प्रवेश आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदार, एमएसएमई, शेतकरी आणि कामगार सर्वांनाच फायदा झाला आहे.
हेही वाचा..
संघाची तुलना अलकायदाशी : हे तर विकृत मानसिकतेचे दर्शन
“निष्पाप अल्पसंख्याकाला जिवंत जाळण्यात आले आणि…” काय म्हणाले कवी कुमार विश्वास?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायले चुकीचे
गुंतवणूकदारांची ‘चांदी’; २.५४ लाख रुपयांचा गाठला उच्चांक!
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ऑस्ट्रेलियाला होणारी भारताची निर्यात ८ टक्क्यांनी वाढली असून त्यामुळे व्यापार ताळेबंदात सुधारणा झाली आहे. उत्पादन, रसायने, वस्त्रोद्योग, प्लास्टिक, औषधनिर्मिती, पेट्रोलियम उत्पादने तसेच रत्ने व दागिने या क्षेत्रांत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. कृषी निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली असून फळे व भाजीपाला, समुद्री उत्पादने, मसाले आणि कॉफीच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये १६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा शेजारी देश न्यूझीलंडसोबतही व्यापार करार केला असून, त्याअंतर्गत न्यूझीलंडही आपल्या सर्व टॅरिफ लाईन्सवर भारतीय निर्यातीसाठी शून्य शुल्क लागू करणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या काळात भारताच्या वस्तू आणि सेवांचा एकूण निर्यात व्यापार वाढून विक्रमी ४१८.९१ अब्ज डॉलर्स झाला असून, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात ५.८६ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.







