मुंबई: बृहन्मुंबईमधील कुर्ला पश्चिम भागात २९ एप्रिल रोजी रात्री एका ३९ वर्षीय व्यक्तीची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अभिजीत किशोर जाधव, दिनेश पवार आणि शुभम गाडगे असे अटक करणाऱ्यात आलेल्या तींघांची नावे आहेत.
माकडवाला कंपाऊंड, हलावपूल, कुर्ला पश्चिम येथे राहणारे बाबा मलप्पा पवार (वय ३९) हे मनपाच्या कचरा गाडीवर काम करत होते. २९ एप्रिल रोजी रात्री १०.१७ च्या सुमारास तक्रारदार राजू मलप्पा पवार यांना त्यांच्या मामाचा फोन आला की, बाबा पवार यांना ब्लॉक क्रमांक ३ च्या रस्त्यावर गोळी मारण्यात आली आहे. राजू पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांचा भाऊ बाबा पवार हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना आढळले.
हे ही वाचा:
विमान भाड्यात वाढ झाल्याने हज यात्रेकरुंचा खर्च वाढला
ब्रिटनमधील क्र्यू शहरात अहमदी पंथातील ९ जण बलात्कार, जबरदस्तीने विवाहप्रकरणात अटक
पाकिस्तानातील ख्रिस्ती समुदाय भीतीच्या छायेखाली
अमेरिका इराण युद्धामुळे पाकिस्तानला आले तेलाचे मोठे बिल
त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी व इतरांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालय, कुर्ला येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी रात्री बाबा पवार यांचा पुतण्या शेखर विजय पवार याच्यासोबत आरोपींचा वाद झाला होता. या वादातूनच अभिजीत किशोर जाधव, दिनेश पवार आणि शुभम गाडगे (सर्व रा. ब्लॉक नं. २, माकडवाला कंपाऊंड) यांनी कट रचून ही हत्या केल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. बाबा पवार हे त्यांचा मित्र माधव शंकर गाडगे यांच्यासोबत गाडीवरून घरी परतत असताना, आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार करून आणि धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली.
विनोबा भावे नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ६१(२) व ३(५) तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३, २५ आणि २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पलंगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.







