मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियासाठी विशेष पथक…
निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून वातावरण बिघडवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी विशेषतः फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि युट्युबवरील हालचालींवर नजर ठेवतील. जर एखादा युट्युबर किंवा सोशल मीडिया वापरकर्ता खोटी माहिती पसरवणे, ब्लॅकमेल करणे किंवा विशिष्ट गटाला लक्ष्य करत असल्याचे आढळल्यास, त्याच्यावर सायबर सेलच्या मदतीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
हे ही वाचा:
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच; हिंदूंची पाच घरे जाळली
…आणि अनिल परब संतापून मातोश्रीतून निघून गेले!
ओला इलेक्ट्रिकसाठी २०२५ वर्ष कठीण
भारत जागतिक स्तरावर सुरक्षित ठिकाणांपैकी एक
सुरक्षा व्यवस्था आणि कडक अंमलबजावणी
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात मुंबईत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. संवेदनशील भागांत गस्त वाढवण्यात येणार असून मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा असेल. या काळात पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले जाणार आहे.
आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल
निवडणूक जाहीर झाल्यापासून मुंबईत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांततापूर्ण मतदानासाठी पोलिसांना सहकार्य करावे.







