आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) मोठी कारवाई करत दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या संशयावरून ११ जणांना अटक केली आहे. हे सर्व संशयित इमाम महमूदर काफिला (IMK) या बांगलादेशस्थित संघटनेशी जोडलेले आहेत, जी बंदी घातलेल्या जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (JMB) मधून उदयास आली होती. २९ आणि ३० डिसेंबर रोजी आसाममधील चार जिल्ह्यांमध्ये; बारपेटा, बक्सा, चिरांग आणि दरंग तसेच पश्चिम त्रिपुरामध्ये रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यांदरम्यान ही अटक करण्यात आली.
कारवाई दरम्यान आसाममधून नसीम उद्दीन, जुनाब अली, अफ्राहिम हुसेन, मिझानुर रहमान, सुलतान मेहमूद, मोहम्मद सिद्दीक अली, रसीदुल आलम, महिबुल खान, शारुक हुसेन आणि मो. दिलबर रझाक यांना बेड्या ठोकण्यात आल्या तर, जगीर मिया या एका संशयिताला पश्चिम त्रिपुरामध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर हा गट अधिक सक्रिय झाला. या गटाने आसाममध्ये एक विशिष्ट सेल स्थापन केला होता, जो बारपेटा येथील एका नेत्याद्वारे चालवला जात होता आणि उमर आणि खालिद नावाच्या दोन बांगलादेशी नागरिकांद्वारे त्याचे समन्वय साधले जात होते.
आयएमकेची स्थापना ज्वेल महमूद उर्फ इमाम महमूद हबीबुल्ला उर्फ सोहेल याने केली होती, जो जेएमबीचा माजी सदस्य होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या राजवटीत बदल झाल्यानंतर, जेएमबी, अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) आणि अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) च्या वरिष्ठ नेत्यांनी आयएमके लीडरशिपला त्यांचे भारतीय मॉड्यूल सक्रिय आणि विस्तारित करण्याचे निर्देश दिले. यासाठी, बांगलादेशी नागरिक उमर आणि खालिद यांना आसाम-आधारित क्रियाकलापांचे समन्वय साधण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.
हे ही वाचा:
“ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा नाश केला आहे”
नुसरत भरुचाने केले महाकाल दर्शन, मौलाना भडकले
मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
भारताने चीनवर लादले तीन वर्षांचे स्टील टॅरिफ; कारण काय?
माहितीनुसार, या गटाचे काम करण्याची पद्धत अत्यंत आधुनिक असून गुप्तता पाळली जाते. ते सदस्यांशी बोलण्यासाठी एन्क्रिप्टेड सोशल मीडिया अॅप्सचा वापर करतात. पोलिसांना असे आढळून आले की त्यांनी आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामधील लोकांना लक्ष्य केले, त्यांना कट्टरपंथी बनवणे आणि पैसे उभारणे यावर लक्ष केंद्रित केले.







