दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर साठवण, रिफिलिंग आणि काळाबाजार प्रकरणात किमान ६ एफआयआर नोंदवल्या असून ६००हून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
यासंदर्भात विविध भागांत गुन्हे नोंदवण्यात आले असून ही प्रकरणे दिल्लीतील अनेक भागांत नोंदवली गेली आहेत. त्यात बाह्य उत्तर दिल्लीत २ प्रकरणे, शकरपूर, रोहिणी, गांधी नगर, मुंडका येथे प्रत्येकी १ गुन्हा नोंदवला गेला आहे.
मुंडका येथील मोठी कारवाई
मुंडका येथे गुरुजी इन्डेन नावाने चालणाऱ्या गोदामावर क्राइम ब्रांचने छापा टाकून ६१० LPG सिलिंडर जप्त केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या कंपन्यांचे सिलिंडर एकाच ठिकाणी साठवले होते. हे गोदाम फक्त इंडेन कमर्शियल सिलिंडर वितरित करण्यासाठी अधिकृत होते. जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये ४२३ इंडेन, ९२ भारत गॅस, ९५ एचपी गॅस ((भरलेले आणि रिकामे दोन्ही प्रकार) यांचा समावेश आहे. ही माहिती उप-पोलिस आयुक्त (गुन्हे) संजीव कुमार यादव यांनी दिली.
हे ही वाचा:
होर्मुझ सामुद्रधुनीमधील LPG टँकर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाचे ‘ऑपरेशन संकल्प’
‘धुरंधर: द रिव्हेंज’ रिलीजपूर्वीच सुपरहिट! ३७५ कोटींची कमाई
“जलमार्ग सुरक्षित करण्यासाठी कोणाचीही गरज नाही” ट्रम्प कोणावर संतापले?
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक जबरदस्ती धर्मांतर रोखण्यासाठीच
साठ्यातील अनियमितता
प्राथमिक तपासात साठा नोंदींमध्ये तफावत आढळली. १० मार्चपर्यंत इंडेन कमर्शियल सिलिंडरचा अधिकृत साठा शून्य असणे अपेक्षित होते. मात्र छाप्यात १३३ भरलेले इंडेन सिलिंडर आढळले. यामुळे बेकायदेशीर साठवण आणि अनियमित व्यवस्थापनाचा संशय निर्माण झाला आहे.
कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा डाव
पोलिसांच्या मते अशा प्रकारची साठेबाजी तुटवड्याच्या काळात कृत्रिम कमतरता निर्माण करण्यासाठी केली जाते. नंतर हे सिलिंडर काळ्या बाजारात जास्त दराने विकले जातात
कायदेशीर कारवाई
या प्रकरणात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोदाम मालक फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
दिल्लीत छापे आणि अटक
शकरपूर (पूर्व दिल्ली) येथून योगेश गुप्ता (४६) याला अटक करण्यात आली आहे. तो मोठ्या घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून २ घरगुती सिलिंडर, ३ छोटे सिलिंडर, गॅस ट्रान्सफर पाइप, रिफिलिंग मशीन, वजनकाटा जप्त करण्यात आले. तर गांधी नगर (शाहदरा) येथून राम विलास शर्मा (५५) याला ताब्यात घेण्यात आले त्यानेही घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून व्यावसायिक वापरासाठी विक्री केल्याचे समोर आहे. त्याच्याकडे ९ एलपीजी सिलिंडर, २ गॅस फिलिंग मशीन, वजनकाटा इत्यादि साहित्य जप्त केले गेले आहे. रोहिणीमध्ये पुष्पेंद्र या डिलिव्हरी बॉयला पकडण्यात आले आहे. घरगुती सिलिंडरमधून कमर्शियल सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करून काळाबाजार करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे २ भरलेले कमर्शियल सिलिंडर, १५ घरगुती सिलिंडर, ४ वजनकाटे, ४ रिफिलिंग पाइप, मोटारसायकल हे जप्त केले गेले.
बावाना भागातील बेकायदेशीर रिफिलिंग प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. लोकेश कुमार यादव हा मोठ्या एचपी सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना पकडला गेला तर अमर जीत कुमार अशाच प्रकारच्या बेकायदेशीर रिफिलिंगमध्ये सहभागी होता. पोलिसांनी मोठे व छोटे सिलिंडर, गॅस ट्रान्सफर पाइप (नोझलसह), जप्त केले आहेत.
पोलिसांनी स्पष्ट केले की, बेकायदेशीर साठवण आणि रिफिलिंगमुळे नियमांचे उल्लंघन होते. तसेच गर्दीच्या भागात मोठ्या आगीचा आणि सुरक्षेचा धोका निर्माण होतो.







