बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित मालिका ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ आता कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि मुंबई पोलिसांकडे या मालिकेविरुद्धच्या तक्रारीबाबत कारवाईचा अहवाल मागितला आहे. ही तक्रार एका दृश्याबद्दल आहे जिथे अभिनेता रणबीर कपूर, हा कोणत्याही चेतावणी (डिस्क्लेमर) शिवाय बंदी घातलेली ई- सिगारेट (व्हेप) वापरताना दिसत आहे.
इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ चे उल्लंघन करून ई- सिगारेटची जाहिरात, चित्रण किंवा प्रमोशनमध्ये सहभागी असल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना अभिनेता रणबीर कपूर, द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.
मालिकेच्या एका दृश्यात रणबीर कपूर कोणत्याही डिस्क्लेमरशिवाय ई- सिगारेट ओढताना दिसत आहे, असे तक्रारदार विनय जोशी यांनी आयोगाला सांगितले आहे. तक्रारदाराने पुढे आरोप केला की, हे दृश्य उघडपणे प्रसारित केले गेले होते, ज्यामुळे अशा बंदी घातलेल्या पदार्थांच्या वापराला प्रोत्साहन देऊन तरुण प्रेक्षकांची दिशाभूल झाली किंवा त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव पडला. अशा बेजबाबदार कंटेंटमुळे बेकायदेशीर कृतींना प्रोत्साहन मिळते, कायद्याच्या अंमलबजावणीचा अनादर होतो आणि सार्वजनिक आरोग्य आणि नैतिकतेला हानी पोहोचते अशी चिंता तक्रारदाराने व्यक्त केली.
हे ही वाचा :
झारखंडमधील दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा पाय खोलात!
एचडीएफसी बँकेत दरोडेखोरांनी लुटले १ कोटी
दहशतवादी पन्नूच्या प्रमुख सहकाऱ्याला कॅनडामधून अटक
यानंतर आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये तरुण पिढ्यांवर चुकीचा प्रभाव टाकू शकणाऱ्या अशा कन्टेन्टवर त्वरित बंदी घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिस आयुक्तांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे उत्पादक आणि आयातदार यांची ओळख आणि कामकाजाची चौकशी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. आयुक्तांनी आयोगाकडे कारवाई अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे.







