पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगार राजू भाले आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (IG) सुनील फुलारी यांनी या टोळीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. ही टोळी अलीकडेच घडलेल्या एका खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आली होती.
फेब्रुवारी २०२५ मध्ये इंदापूरच्या वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या खून प्रकरणात ३४ वर्षीय उत्तम जलिंदर जाधव (राहणार – खोरोची) याची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, राजू भाले टोळीला संशय होता की जाधवने त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीला मदत केली होती. या हत्येप्रकरणी एकूण १३ आरोपी ओळखले गेले असून, त्यामध्ये राजू भाले मुख्य सूत्रधार आहे. त्यापैकी १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर तीन आरोपी फरार आहेत.
मकोका अंतर्गत आरोपी ठरलेल्यांमध्ये राजेंद्र उर्फ राजू महादेव भाले (३० ), रामदास भाले (२६ ), शुभम आतोले (१९), स्वप्निल वाघमोडे (२५), नाना भाले (२८), निरंजन पवार (२७), तुकाराम खरात (३०), जीजा पाटोले (३०), अशोक यादव (३०) आणि धनाजी मसुगडे (३८) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे इंदापूर तालुका परिसरातील रहिवासी असून पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये कुख्यात गुन्हेगार म्हणून नोंदले गेले आहेत.
यांच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न, दरोडे, चोरी, खंडणी वसुली, टोळीची बैठक घेणे अशा अनेक गंभीर कलमांतर्गत पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे मृतांचा आकडा ६० वर, शेकडो अजूनही बेपत्ता!
७९ वा स्वातंत्र्यदिन: पाहुण्यांसाठी “नवभारत” ज्यूट बॅग्स, भेटवस्तू व पावसाळी साहित्य!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पणाला केले वंदन
पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण, १०३ मिनिटं!
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या प्रस्तावावर IG सुनील फुलारी यांनी संपूर्ण टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. कायदेतज्ज्ञांच्या मते, मकोका अंतर्गत कारवाई झाल्यास आरोपींना जामीन मिळणे अत्यंत कठीण होते, शिक्षा कठोर होते आणि खटले विशेष न्यायालयांमध्ये जलदगतीने चालवले जातात.
या कारवाईचं नेतृत्व पुणे ग्रामीण एसपी संदीपसिंह गिल, अतिरिक्त एसपी गणेश बिरादार आणि उपविभागीय अधिकारी सुधर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. पोलिसांचं म्हणणं आहे की हा निर्णय तालुक्यातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.







