दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ चौकशीच्या रडारवर आहे. अल- फलाह ग्रुपचा संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी हा देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. दिल्लीतून एक मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला असून बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधी रुपयांची जमीन मिळवल्याचा आरोप जवादवर आहे. दिल्ली बॉम्बस्फोट आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात जवाद आधीच ईडीच्या ताब्यात आहे.
अल- फलाह प्रकरणातील तपासात असे दिसून आले आहे की, दिल्लीतील मदनपूर खादर येथील खसरा क्रमांक ७९२ येथील जमीन जवाद अहमद सिद्दीकीशी संबंधित असलेल्या तरबिया एज्युकेशन फाउंडेशनने बनावट जनरल पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे फसवणूक करून मिळवली होती. जवादला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याची चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही जमीन दक्षिण दिल्लीतील एका विशिष्ट क्षेत्रात पसरलेली आहे. ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे या कागदपत्रांवर आहेत त्यांचे निधन अनेक वर्षांपूर्वी झाले आहे.
बनावट कागदपत्रे ७ जानेवारी २००४ रोजीची आहे. ही कागदपत्रे अनेक सह- मालकांचे हक्क भूले राम यांचा मुलगा विनोद कुमार यांना हस्तांतरित करण्याचा दावा करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या कागदावरील स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे दिलेल्या तारखेच्या खूप आधी मरण पावलेल्या लोकांचे आहेत. ७ जानेवारी २००४ रोजी तयार केलेल्या या बनावट जीपीएमध्ये १९७२ ते १९९८ दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अनेक लोकांची नावे आहेत. नथू (मृत्यू १९७२- मदनपुर खादर), हरबंस सिंग (मृत्यू १९९१- तेहखंड), हरकेश (मृत्यू १९९३- तुघलकाबाद), शिव दयाळ (मृत्यू १९९८- चुरिया मोहल्ला, तुघलकाबाद) जय राम (मृत्यू १९९८- तुघलकाबाद)
असे असूनही, २००४ मध्ये या सर्व मृतांना “जमीन विक्रेते” म्हणून दाखवण्यात आले. अधिकाऱ्याने ही कागदपत्रे “पूर्णपणे बनावट आणि बेकायदेशीर दस्तऐवज” म्हणून वर्णन केले आहे. या बनावट कागदाच्या आधारे, २७ जून २०१३ रोजीचा एक नोंदणीकृत विक्री करार तयार करण्यात आला, जो तरबिया एज्युकेशन फाउंडेशनला ७५ लाख रुपयांना जमीन हस्तांतरित करण्यासाठी तयार करण्यात आला. विनोद कुमार यांनी अनेक सह- मालकांसाठी वकील म्हणून करारावर स्वाक्षरी केली, ज्यात खूप पूर्वी मरण पावलेल्यांचाही समावेश होता आणि प्रत्यक्षात मृत व्यक्तींचे अविभाजित शेअर्स जिवंत असल्यासारखे आणि त्यांनी संमती दर्शविल्याप्रमाणे विकले. तपासात असे दिसून आले की, मृत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठ्याचे ठसे बनावट होते आणि जमीन हस्तांतरण प्रक्रिया खोट्या कागदपत्रांवर आधारित होती, ज्याचा थेट फायदा तरबिया एज्युकेशन फाउंडेशनला झाला.







