मुंबईत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकावर (SST) हल्ला झाल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले येथे घडली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दल विलेपार्ले पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे १:२५ च्या सुमारास विलेपार्ले येथील मिलन सबवे परिसरात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वाहनांची तपासणी सुरू होती. नोडल अधिकारी सुरेश जानू राठोड आणि त्यांचे पथक एका पांढऱ्या मारुती स्विफ्ट कारची तपासणी करत असताना, गाडीत मागे बसलेल्या इफ्तीकार अहमद नावाच्या प्रवाशाने व्हिडीओ चित्रीकरणाला आक्षेप घेतला.
हे ही वाचा:
मुंबई मनपा निवडणूक: अफवा पसरवणाऱ्या युट्युबर्सवर करडी नजर
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच; हिंदूंची पाच घरे जाळली
आयबीसीमध्ये सुधारणा केल्याने कर्ज वसुलीत आराम
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व्हिडीओग्राफर धीरज पांचाळ चित्रीकरण करत असताना, आरोपीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जेव्हा अधिकारी राठोड यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने त्यांनाही ढकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीच्या काळात सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







