मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला असून बंडखोरांनी हल्ला केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये संघर्ष सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही काही हिंसक घटना घडल्या होत्या. दरम्यान, कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवार, २६ एप्रिल रोजी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
हुतात्मा झालेले दोन्ही जवान १२८ बटालियनचे होते. मणिपूरच्या बिष्णुपुर जिल्ह्यातील नारानसेना भागात ही बटालियन तैनात आहे. नारानसेना भागात ही घटना घडली असून कुकी बंडखोरांनी हा हल्ला केला. मणिपूरच्या नारानसेना भागात मध्यरात्रीच्या सुमारास कुकी बंडखोरांनी हल्ला केला. यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली आहे.
हे ही वाचा:
२६३ चे लक्ष्य गाठून पंजाबचा नवीन विक्रम
‘अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देऊन स्वार्थाला प्राधान्य दिले’
मतदाना ऐवजी तरुणाने घातला ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीचा घाव!
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!
याबाबत अधिक माहिती देताना मणिपूर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास कुकी उग्रवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला. याआधी दंगेखोरांनी कांगपोकपी, उखरूल आणि इंफाळ पूर्वमधील ट्रायजंक्शन जिल्ह्यात एकमेकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात कुकी समुदायातील २ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर थौबल जिल्ह्यातील हेईरोक आणि तेंगनौपाल दरम्यान दोन दिवस गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोइरंगपूरेल मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात कांगपोकपी आणि इंफाळ पूर्व या दोन्हीकडील सशस्त्र उग्रवादी सहभागी होते. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मैतेई आणि कुकी समुदायात सुरु झालेला हा हिंसाचार शमण्याची चिन्हे नसून गोळीबार, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.







