मुंबईतील मुलुंड परिसरात ‘डिजिटल अटक’ या नव्या सायबर फसवणूक प्रकाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इंटरपोल अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी ७१ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल २.०४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिताच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार भास्करराव इरा (७१) हे गेल्या वीस वर्षांपासून मुलुंड पश्चिम येथे कुटुंबासह वास्तव्यास असून २०१२ मध्ये तळोजा येथील मेलन लॅब्स कंपनीतून निवृत्त झाले आहेत. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या निनावी कॉलमधून स्वतःला ‘मुंबई सायबर सिक्युरिटी’चे अधिकारी एस. के. जयस्वाल असल्याची ओळख करून देण्यात आली. तुमचे नाव एका गंभीर गुन्ह्यात आल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
यानंतर करण शर्मा नावाच्या व्यक्तीने ईडी अधिकारी असल्याचा दावा करत संपर्क साधला. टिळक नगरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणातील छाप्यात सापडलेल्या डायरीत विजयकुमार इरा यांचे आधार कार्ड आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असल्याचे सांगण्यात आले. फसवणूक करणाऱ्यांनी इंटरपोल रेड नोटीस, निधी गोठवण्याचा आदेश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवली.
व्हिडिओ कॉलद्वारे न्यायालयीन अधिकारी असल्याचे भासवून ‘तात्काळ डिजिटल अटक’ करण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकण्यात आला. या भीतीपोटी विजयकुमार इरा यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण २,०४,४७,०४७ रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे दिल्यानंतरही अधिक रकमेची मागणी सुरूच राहिल्याने त्यांना संशय आला.
त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. चौकशीत हा प्रकार ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली करण्यात आलेली सायबर फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले. अखेर २४ डिसेंबर २०२५ रोजी पीडिताने सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार दाखल केली.
हेही वाचा..
देशाच्या स्वातंत्र्यात अनेकांचे योगदान
चाकू हल्ला करून ‘अज्ञात’ द्रव फवारला; १४ जण जखमी
राष्ट्रपतींच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण
सायबर पोलिसांनी करण शर्मा, एस. के. जयस्वाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तसेच लाभार्थी बँक खातेदारांविरोधात फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.







