बिटकॉइन घोटाळा प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. राज कुंद्रा याच्याकडे १५०.४७ कोटी रुपयांचे २८५ बिटकॉइन असल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने कुंद्रा याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यात राज कुंद्रा हा व्यवहारांमधील केवळ मध्यस्त नसून एक फायदेशीर मालक असल्याचे म्हटले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात अलीकडेच आरोपपत्र दाखल करण्यात आले.
ईडीने सांगितले की, राज कुंद्राकडे २८५ बिटकॉइन आहेत जे त्याला क्रिप्टो घोटाळ्याचा मास्टरमाइंड दिवंगत अमित भारद्वाजकडून मिळाले होते. तपास यंत्रणेने पुढे म्हटले आहे की कुंद्राने बिटकॉइन वॉलेट पत्त्यांसह महत्त्वाचे पुरावे जाणूनबुजून लपवले आणि भारद्वाजकडून मिळालेले बिटकॉइन परत केले नाहीत. कुंद्रा बिटकॉइन बाळगत राहिला आणि त्याचा उपभोग घेत राहिला, असे तपास यंत्रणेने म्हटले आहे. गुन्हेगारी कारवायांद्वारे मिळवलेल्या निधीचे मूळ लपवण्यासाठी त्याने त्याची पत्नी, शिल्पा शेट्टीसोबत बाजारभावापेक्षा खूपच कमी दराने व्यवहार केला.
महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिअबल टेक प्रायव्हेट लिमिटेड, दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज नावाच्या कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर कुंद्राविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्यात आला. तपासात असे दिसून आले आहे की बिटकॉइनचा वापर खाणकामासाठी केला जाणार होता आणि गुंतवणूकदारांना क्रिप्टो मालमत्तेमध्ये मोठा परतावा मिळणार होता.
हे ही वाचा..
शिक्षकांवर कारवाईचा निर्णय घेणार निवडणूक आयोग
बीएसएनएलचा ४ जी स्टॅक भारताच्या अवलंबित्वापासून आत्मनिर्भरतेकडे झालेल्या प्रवासाचे प्रतीक
बरेलीतील मौलाना विसरलेत राज्यात कोणाची सत्ता; धडा शिकवणार
पाकिस्तानने पंजाब प्रांताचा वापर शेजारील देशाविरोधात केला! काय म्हणाले बलोच नेते?
राज कुंद्राला गेन बिटकॉइन पोंझी घोटाळ्याचा मास्टरमाइंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज कडून २८५ बिटकॉइन मिळाल्याचा आरोप आहे. ही रक्कम युक्रेनमध्ये मायनिंग फर्म उभारण्यासाठी वापरण्यात येणार होती. तथापि, हा करार फसला आणि कुंद्राकडे अजूनही २८५ बिटकॉइन आहेत ज्यांची किंमत सध्या १५० कोटींपेक्षा जास्त आहे. कुंद्रा याने मध्यस्थ म्हणून काम केल्याचा दावा केला असला तरी, त्यांनी दावा सिद्ध करण्यासाठी कोणतेही कागदपत्र दिलेले नाही.







