अंधेरीतील एका दिग्दर्शकाला बंदुकीच्या धाकावर तीन तास ओलीस ठेवत दहा लाख रुपये उकळल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी अभिनेत्री निकिता घाग, अभिनेता विवेक जगताप यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार १४ ऑगस्ट २०२५ रोजी घडला असून, ५ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
चित्रपट भूमिकेच्या बहाण्याने ओळख
एफआयआर नुसार, ४८ वर्षीय दिग्दर्शक कृष्णकुमार मीणा हे हिंदी, पंजाबी व भोजपुरी अल्बमचे निर्माते असून, ते वीरा देसाई रोड येथे राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची ओळख अभिनेत्री निकिता घाग हिच्याशी झाली होती. तिने कामासाठी अंधेरी (प.) येथील त्यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर घागने गुंतवणूकदार असल्याचे सांगून मीणा यांच्याशी भेटीचा आग्रह धरला; मात्र ते मुंबईबाहेरील शूटिंगमुळे टाळण्यात आले.
दिग्दर्शकाला तीन तास ओलीस
१४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घाग व तिच्यासह ५६ जण मीणा यांच्या कार्यालयात घुसले. त्यांनी सहकाऱ्यांना धमकावून बाहेर काढले आणि मीणा यांना चुकीच्या आरोपांनी माध्यमांसमोर बदनाम करण्याची धमकी दिली.
यानंतर विवेक जगतापने स्वतःला गुंड असल्याचे सांगून मीणा यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. विरोध केल्यावर त्यांना शिवीगाळ, मारहाण करून चाकू व पिस्तूल दाखवत तीन तास ओलीस ठेवण्यात आले.
हे ही वाचा:
या योगासनांनी करा स्नायूंना बळकट
लाल किल्ला परिसरात १ कोटींचा रत्नजडित कलश चोरीला!
पळपुट्यांना भारतात आणण्याच्या हालचालींना गती
बँक खात्यातून दहा लाख हस्तांतरित
जीवाच्या भीतीने मीणा यांनी मोबाईल बँकिंग ऍप उघडून आपल्या खात्यातील १२ लाख शिल्लक दाखवली. त्यातील दहा लाख रुपये जबरदस्तीने निकिता घागच्या खात्यात वळविण्यात आले.
या प्रकाराने हादरलेल्या मीणा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2) (स्वेच्छेने दुखापत करणे), 189(2) (अनधिकृतपणे नाणे बनविण्याची साधने घेणे) तसेच इतर कलमे आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.







