मुंबई : खासगी कंपनीतील माजी वरिष्ठ लेखाधिकारीने कंपनीचे बँक लॉगिन आयडी व पासवर्ड गैरवापरून तब्बल ८ कोटी ६९ लाख ९३ हजार ४६ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दीड महिन्यांपासून फरार असलेल्या जयप्रकाश बसंतीलाल सोडानी (३७) याला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे.
सोडानी हा संबंधित कंपनीत २१ सप्टेंबर २०१९ ते २५ मे २०२२ या कालावधीत वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत होता. विश्वासू कर्मचारी असल्याने त्याच्याकडे खात्यांची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. कंपनीतून राजीनामा दिल्यानंतरही त्याने बँकेचे लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून ऑनलाइन व्यवहार सुरूच ठेवले. त्याने कंपनीच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या, पत्नी कविता महेश्वरीच्या तसेच इतर व्यक्तींच्या खात्यांमध्ये वळवली.
हे ही वाचा:
अमेरिकेत कौटुंबिक वादातून भारतीयाने पत्नीसह तिघांना संपवले
RBI कडून बँकिंग व्यवस्थेला मोठा दिलासा
भारताचा ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मजबूत
ट्रम्प यांचे हातपाय गारठतील असा कॅनेडीयन सुवर्णपेच
ऑडिटदरम्यान कंपनीचे खाते तपासताना कोट्यवधींचे संशयास्पद ऑनलाइन व्यवहार उघड झाले. तपासात १ फेब्रुवारी २०२३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८.६९ कोटींची रक्कम अपहार केल्याचे निष्पन्न झाले. यातील काही रकमेचा वापर राजस्थानमध्ये मालमत्ता खरेदीसाठी करण्यात आला असून त्यासाठी १.३१ कोटी रुपये अदा करण्यात आले. तसेच १७.९० लाख रुपये कंपनीच्या खात्यात परत जमा केल्याचेही तपासात समोर आले आहे.
चौकशीत सोडानीने बँकेत कंपनीऐवजी स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट केल्यामुळे व्यवहारांचे अलर्ट त्याच्याकडे येत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी कंपनीचे खातेप्रमुख विपिन वरखावत यांनी समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोडानी, त्याची पत्नी व इतर खातेदारांविरोधात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक केलेल्या सोडानीला बोरीवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार सहआरोपींचा शोध सुरू असून तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.







