उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यात रविवारी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काशीपूर परिसरात रात्री उशिरा काही लोक परवानगीशिवाय रस्त्यावर मिरवणूक काढत होते. पोलिसांनी त्यांना रोखले असता त्यांनी पोलिसांना मारहाण करत वाहनावर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. जमावाने “आय लव्ह मोहम्मद” अशा घोषणा दिल्याची माहिती आहे.
रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास, शहरातील अली खान परिसरात काही लोक “आय लव्ह मोहम्मद” अशा घोषणा देत मिरवणूक काढत होते. या मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या मिरवणुकीची माहिती स्थानिकांनी ११२ या पोलिसांच्या क्रमांकावर संपर्क करून दिली. यानंतर तैनात असलेले दोन पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निदर्शकांनी त्यांच्याशी झटापट सुरू केली. जमावाने पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला.
यावेळी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यावेळी ते दोन्ही अधिकारी गर्दीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. यानंतर मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा :
‘जीएसटी बचत उत्सवा’नंतर काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त?
सपकाळांचा स्वप्नकाळ राहुल गांधी नव्हे; फडणवीस पंतप्रधान
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत दिले स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या गोध्रामध्ये मुस्लीम समुदायाच्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्याची घटना घडली होती. “आय लव्ह मोहम्मद” अशा आशयाचा रील बनवणाऱ्या एकाला गोध्रा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. चौकशीदरम्यान या तरुणाला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आणि यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी पोलीस ठाण्याकडे गर्दी करत घोषणाबाजी केली. पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक करण्यात आली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.







