नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात पीडितेला दाखवले झाकीर नाईकचे व्हीडिओ

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात पीडितेला दाखवले झाकीर नाईकचे व्हीडिओ

नाशिकमधील टीसीएस लैंगिक छळ आणि कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील आरोपपत्रातून तपास अधिकाऱ्यांनी “नियोजित कट” असे वर्णन केलेली बाब समोर आली आहे. पीडितांपैकी एका महिलेने आरोप केला आहे की, तिला पाकिस्तानातील इस्लामी धर्मगुरू आणि प्रचारक तारीक जमील तसेच भारतातून परागंदा झालेला प्रचारक झाकीर नाईक यांचे व्हिडिओ पाहण्यास भाग पाडण्यात आले. तिच्या म्हणण्यानुसार, इस्लाम धर्माविषयी माहिती मिळावी म्हणून हे व्हिडिओ दाखवले गेले.

हे निवेदन मागील आठवड्यात नाशिक न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्राचा भाग आहे. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, आरोपींनी तिचा मानसिक ताण कमी करण्याच्या नावाखाली तिच्यावर नियोजित मानसिक आणि धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. तिच्या म्हणण्यानुसार, इस्लाम स्वीकारल्यास मानसिक ताण कमी होईल, असा तिचा विश्वास बसवण्यात आला आणि ती हळूहळू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागली.

हे आरोपपत्र २३ वर्षीय आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाणे येथे नोंदवलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तर आणि निदा खान यांच्याव्यतिरिक्त, आरोपपत्रात मतीन पटेल यांचेही नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. त्यांनी फरार असताना निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे. आरोपपत्रानुसार, निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती असूनही मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला. निदा खानच्या अटकेपूर्वी चौकशीदरम्यान पोलिसांनी तिच्या ठिकाणाबद्दल विचारले असता, पटेल वारंवार म्हणाले, “इम्तियाज जलील साहेबांना विचारावे लागेल.” मात्र सखोल चौकशीनंतर त्यांनी पोलिसांना निदा खान, तिची आई, वडील, भाऊ आणि मावशी यांना ज्या ठिकाणी आश्रय दिला होता त्या ठिकाणाची माहिती दिली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

सोनं-चांदीत मोठी पडझड

एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे पुढील उपप्रमुख

वैभव सूर्यवंशीला आता टीम इंडियाची कॅप द्या!

आरबीआयकडून रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम

पीडितेने आपल्या जबाबात सांगितले की, आरोपींनी तिच्या मानसिक तणावाचा फायदा घेत मानसिक आणि धार्मिक प्रभाव टाकण्याची मोहीम राबवली. विवाहित असलेल्या दानिश शेखने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले, असेही तिने म्हटले. भविष्य आणि कुटुंबाच्या स्वीकाराबाबत भीती व्यक्त केल्यावर दानिश म्हणाला, “घाबरू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. अल्लाह आपल्या सोबत आहे. देवाची गाणी ऐकणे आणि मंदिरात जाणे बंद कर, तुझा ताण कमी होईल.” त्यानंतर त्याने तिला तसबिह पठण करण्यास सांगितले. पीडितेच्या मते, दानिशने तिला सांगितले, “जितके जास्त अल्लाहचे नाव घेशील तितकी तुझे पाप माफ होतील आणि सत्कर्मे वाढतील. अस्तगफार वाचशील, म्हणजे अल्लाहकडे क्षमा मागशील, तर मानसिक ताण कमी होईल.”

तिने पुढे सांगितले की, दानिशने तिला तारिक जमील यांचे व्हिडिओ पाहण्यास आणि त्यांची भाषणे ऐकण्यास सांगितले. पीडितेने असेही सांगितले की दानिशकडे तिच्या बँक खात्यांची संपूर्ण माहिती, यूपीआय पिन आणि खात्यातील पैशांची माहिती होती. “दानिशने तौसिफ आणि निदाला मला इस्लाम धर्माविषयी माहिती देण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दोघे वेळोवेळी मला इस्लाम धर्माबद्दल सांगत असत. तौसिफने मला युट्यूबवर जाऊन झाकीर नाईक आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ शोधून पाहण्यास सांगितले आणि मी त्याच्या सांगण्याप्रमाणे ते पाहिले,” असे पीडितेने म्हटले.

आरोपपत्रानुसार, पीडितेला इस्लामी धर्मशास्त्र, इब्राहिम यांच्या कथा, बकरी ईद, झमझम पाणी, कुर्बानी तसेच जन्नत (स्वर्ग) आणि जहन्नुम (नरक) या संकल्पनांची माहिती देण्यात आली. “इस्लाम धर्म स्वीकारल्यास माझा मानसिक ताण कमी होईल, असा माझा विश्वास बसला होता. मी हळूहळू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले,” असे पीडितेने म्हटले. आरोपपत्रात १०६ साक्षीदारांचे जबाब समाविष्ट आहेत. त्यामध्ये तक्रारदार, तिची आई, टीसीएसचे कर्मचारी आणि व्यवस्थापन, पॉश (POSH) समितीचे सदस्य आणि तपास अधिकारी यांचा समावेश आहे.

दरम्यान, पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की तिच्या मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यात आला आणि कुटुंबाला इजा करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. गेल्या वर्षभरात मुलीच्या राहणीमानात बदल झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. आधुनिक कपड्यांऐवजी ती पूर्ण झाकलेले सलवार-कुर्ते घालू लागली आणि तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या, असे निवेदनात म्हटले आहे. आईच्या म्हणण्यानुसार, मुलीने कुटुंबाला सांगितले की दानिश शेख, तौसिफ अत्तर आणि निदा खान यांनी तिला कलमा शिकवला आणि कुटुंबाने धर्मांतर केले नाही व देवतांच्या मूर्ती काढल्या नाहीत तर घरात “कयामत” येईल, असा इशारा दिला.

नाशिकमधील आयटी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी शोषण, सक्तीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांचे आरोप केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या प्रकरणात एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असून, शहरातील मुंबई नाका पोलिस ठाणे येथे आणखी आठ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काही पीडितांनी धार्मिक प्रथा स्वीकारण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, आहाराच्या सवयी बदलण्यासाठी आणि धार्मिक प्रतीके वापरण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही केला आहे.

Exit mobile version