हरियाणातील चरखी दादरी येथील एका भारतीय विद्यार्थ्याची ब्रिटनमधील वूस्टर येथे चाकू मारून हत्या करण्यात आली. कुटुंबाने त्याचा मृतदेह भारतात लवकरात लवकर पाठवण्यासाठी तसेच घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी त्वरीत राजनैतिक हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
पीडित विजय कुमार याच्यावर शनिवारी उशिरा वूस्टरच्या सिटी सेंटरमध्ये हल्ला करण्यात आला. १५ नोव्हेंबरला पोलिसांना वूस्टरमधील बारबर्न रोडवर तो गंभीर जखमी अवस्थेत आढळला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुमार याने यावर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स मधील सरकारी नोकरी सोडून ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले होते. तो युनिव्हर्सिटी ऑफ द वेस्ट ऑफ इंग्लंड (UWE), ब्रिस्टल येथे शिक्षण घेत होते.
हे ही वाचा:
एकाच रात्री पांडवांनी बांधले अंबरनाथ मंदिर!
माओवादी म्हणतायत महिनाभर थांबा… बिळातील साप, शांतीची कबूतरे एकाच वेळी बाहेर
मुस्लिमांवर अत्याचार होईल, तर जिहाद होईल!
भारत-इस्रायल व्यापार चर्चेतून काय लाभ होतोय ?
चरखी दादरीचे आमदार सुनील सत्वपाल सांगवान यांनी सोशल मीडियावर ही घटना शेअर केली आणि विद्यार्थ्याचा मृतदेह त्वरीत भारतात पाठवण्यासाठी सरकारी मदतीची मागणी केली. ते लिहितात, “आम्ही पारदर्शक, न्याय्य आणि ठराविक वेळेत पूर्ण होणाऱ्या चौकशीची मागणी करतो, जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळून न्याय मिळू शकेल.”
स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार, चाकू हल्ल्यापूर्वी काही शाब्दिक वाद किंवा भांडण झाले असावे, परंतु नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. ब्रिटनच्या पोलिसांनी या घटनेवर अधिकृत निवेदन अद्याप जारी केलेले नाही.







