कोकणातील फोंडा घाटात पाच वर्षांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला हा रस्ता अपघात वाटत होता, मात्र मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी तपासातून हा एक सुनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. पैशांच्या वादातून सहा जणांनी मिळून एकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फोंडा घाटात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
२८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडा घाटात अशपाक मुलाणी (वय ३५, रा. बारामती) यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ मोटारसायकल आणि बॅग आढळल्याने कणकवली पोलिसांनी सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजून ‘अपघाती मृत्यू’ची नोंद केली होती. मात्र, हे प्रकरण आता खुनाच्या गुन्ह्यात परावर्तित झाले आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत अशपाक हे बँकांकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असत. यातच त्यांच्यात पैशांच्या वाटपावरून वाद झाले. याच वादातून आरोपींनी कुडाळ येथे कार्यालय सुरू करण्याच्या बहाण्याने अशपाक यांना ५ डिसेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्गात बोलावले. तिथे रात्रीच्या वेळी वाद विकोपाला गेला आणि सहा जणांनी लाठीकाठीने मारहाण करून अशपाकची निर्घृण हत्या केली.
हे ही वाचा:
तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी
आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा
अमेरिकेच्या लष्करी कारवायांनंतर होर्मुझ सामुद्रधुनी बंद!
खाद्यतेल बाजारात सरकारचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’
हत्येनंतर आरोपींनी अशपाकचा मृतदेह, त्याची मोटारसायकल आणि बॅग इनोव्हा कारमधून फोंडा घाटात नेली. मृतदेह आणि वाहने घाटात फेकून देत, हा ‘अपघात’ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व आरोपी दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडून मुंबईकडे पसार झाले होते.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनोज नारायण भंडगे (रा. कामोठे), सुरेंद्र चंद्रहास सोनवडेकर (रा. पनवेल), अतिष भगवान मोरे (दिवा) आणि ऋतुराज शेट्टी (ठाणे) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील दोन मुख्य आरोपी (मनोज भंडगे आणि सुरेंद्र सोनवडेकर) यापूर्वीही फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाले होते आणि काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते.
या खळबळजनक प्रकरणातील इतर दोन आरोपी अमित राऊत आणि मनोज भंडारी अजूनही फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले. या चौघांना आता कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
