पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या ‘सेबाश्रय’ आरोग्य शिबिर उपक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गुडघेदुखीवर उपचारासाठी आरोग्य शिबिरात गेलेल्या एका महिलेला उपचारांनंतर अखेर आपला उजवा पाय गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिषेक बॅनर्जी आणि इतर काही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या उपक्रमाशी संबंधित नोंदवण्यात आलेला हा तिसरा एफआयआर आहे.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतळा येथील मालती बिस्वास यांच्या पती प्रबीर बिस्वास यांनी ९ जुलै रोजी रवींद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, मालती बिस्वास या ८ फेब्रुवारी रोजी गुडघ्याच्या तीव्र वेदनांवर उपचारासाठी सेबाश्रय आरोग्य शिबिरात गेल्या होत्या. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने औषधे लिहून दिली; मात्र डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर स्वतःचे पूर्ण नाव किंवा वैद्यकीय नोंदणी क्रमांक नमूद केला नव्हता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी दिलेली औषधे घेतल्यानंतर मालती बिस्वास यांची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली. त्यानंतर त्या दुसऱ्या सेबाश्रय ‘मॉडेल’ शिबिरात गेल्या. तेथे मोठी रक्कम खर्च करण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रथम एम. आर. बांगूर रुग्णालयात आणि त्यानंतर कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. २५ एप्रिल रोजी त्यांच्यावर गुडघा प्रत्यारोपण (टोटल नी रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या उजव्या पायात गंभीर रक्तवाहिन्यांशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली. परिस्थिती गंभीर झाल्याने २७ मे रोजी डॉक्टरांना त्यांचा गुडघ्याच्या वरून उजवा पाय कापावा लागल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेसाठी वैद्यकीय निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी अभिषेक बॅनर्जी आणि इतर संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
पवारांना मागे टाकत देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम!
डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला
तेल दरवाढीने पाकिस्तानची कोंडी; पेट्रोल, बस-रिक्षा, मालवाहतुकीचे दर वाढले
पश्चिम बंगालमध्ये लागू झालेला ‘गुंडा दमन कायदा’ काय आहे?
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री शरदव्रत मुखोपाध्याय यांनी मालती बिस्वास यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यांनी उपचाराशी संबंधित सर्व कागदपत्रांसह आरोग्य विभागाच्या मुख्यालयात येण्याचे निर्देश दिले असून संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.
सेबाश्रय हा आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. मात्र, या उपक्रमाशी संबंधित कथित अनियमिततांमुळे आतापर्यंत तीन एफआयआर दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप आरोप सिद्ध झालेले नसून, निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.







