उत्तर प्रदेश एसटीएफच्या नोएडा युनिटने गाझियाबादच्या कवी नगर पोलिस स्टेशन परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एसटीएफने हर्षवर्धन जैन याला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा गाझियाबादच्या कवी नगर परिसरातील रहिवासी आहे.
एसटीएफच्या नोएडा युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन केबी ३५ कविनगर येथे घर भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक दूतावास चालवत होता. तो स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोरगा, पौलविया, लोडोनिया इत्यादी देशांचा राजदूत म्हणवून घेत असे. आरोपी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करत होता. (सामान्यतः विदेशी दूतावास, वाणिज्य दूतावास आणि राजनयिक यंत्रणा संबंधित वाहनांचा वापर करतात)
नोएडाच्या एसटीएफ युनिटने हे प्रकरण सोडवण्यासाठी विविध केंद्रीय एजन्सींशी संपर्क साधला आणि कारवाई केली. केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी या परिसरात छापा टाकला आणि जैनला अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने भोळ्या लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि स्वतःला एक शक्तिशाली राजनयिक म्हणून सादर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि विविध राष्ट्रप्रमुखांसह जागतिक नेत्यांचे मॉर्फ केलेले फोटो वापरले.







