अंधेरी पश्चिम येथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राजश्री बाबूराव मोरे (३९) यांच्या कारला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. आरोपी राहिल शेखने अपघातानंतर कारला ओव्हरटेक करून थांबवलेल्या मोरे यांच्याशी शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी आरोपी राहिल शेखविरोधात गुन्हा दाखल करून त्याची कार जप्त केली आहे. मात्र, आरोपीला चौकशीनंतर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
घटना कशी घडली?
अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जुलै ते ७ जुलैच्या दरम्यान रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. राजश्री मोरे या सिद्धार्थ रुग्णालयातून घरी परतत असताना वीरा देसाई रोडवरील कंट्री क्लबजवळ राहिल शेखने आपल्या कारने मोरे यांच्या कारला जोरदार धडक दिली.
हे ही वाचा:
जिनपिंग उतरणीला; पण काँग्रेसची निष्ठा कायम
राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’
कंगना रणौत भडकल्या काँग्रेस नेत्यांवर !
मतदार पडताळणी : भीती निर्माण करण्याचं राजकारण
धडक दिल्यानंतर मोरे यांच्या ड्रायव्हरने राहिल शेखच्या कारला ओव्हरटेक करून थांबवले. त्यावेळी राहिल हा पूर्णपणे नशेत असून अर्धनग्न अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला कारमधून बाहेर काढले असता त्याने राजश्री मोरे व पोलिसांशीही शिवीगाळ केली.
मनसे नेत्याचा मुलगा
तक्रारीनुसार, राहिल शेखने “माझे वडील मनसेत आहेत” असे म्हणत धमकीही दिली. तसेच, त्याने मोरे यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्नही केला. अंबोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व राजश्री मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अंबोली पोलिस अधिक तपास करत असून आरोपीला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या नातलगांकडून कायदा हातात घेण्याच्या घटनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







