शिवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल २०२५’दरम्यान शेकडो मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी मोठी कारवाई करत दिल्ली आणि कर्नाटक येथून आलेल्या दोन आंतरराज्यीय टोळ्यांतील पाच जणांना अटक केली असून तब्बल १९ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१९ ते २१ डिसेंबरदरम्यान स्पेस बाउंड वेब लॅब प्रा. लि.च्या वतीने शिवडी टिंबर पॉन्ड प्लॉट, अटल सेतूजवळ हा भव्य संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मुंबईसह राज्याबाहेरून हजारो तरुणांनी महागडी तिकिटे व पासेस घेऊन उपस्थिती लावली होती. मात्र, या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल फोन, सोनसाखळ्या व पाकीट चोरीचे सत्र सुरू केले. याबाबत शिवडी पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या.
पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करून दोन विशेष पथके तयार केली. परिसरातील तसेच फेस्टिव्हलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासताना संशयाची सुई काही व्यक्तींवर येऊन ठेपली. गस्तीदरम्यान पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या उडुगलप्पा दासा भोवी (रा. शिवमोग्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत चार महागडे मोबाईल फोन सापडले.
दरम्यान, के-शेड परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या किया कॅरेन्स कारसह चार जणांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
अल फलाह विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द होणार?
जीनत अमान यांनी शेअर केला लेटेस्ट फोटोशूटचा अनुभव
कार अपघाताने जीवनाचे महत्त्व समजावले
या कारमधून १५ मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. शाहबाज भोले खान उर्फ शोएब (२८), मोहितकुमार रामकुमार पटेल (२५), निखिल एकनाथ यादव (१९) आणि महेशकुमार सुनेहरीलाल कुंभार (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकशीत ही टोळी दिल्लीची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.
तपासात कर्नाटक आणि दिल्ली येथील या दोन स्वतंत्र टोळ्या खास ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये चोरी करण्यासाठी मुंबईत आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एकूण १९ मोबाईल फोन व वाहन असा १९.१४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







