मुंबईतील कांदिवली परिसरात मोबाईल चोरीच्या एका क्षुल्लक घटनेवरून दोन गटांत झालेल्या भांडणात हस्तक्षेप करण्यासाठी आणि संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच संशयित आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रविवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर झालेल्या या हल्ल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
हे ही वाचा:
१९९६ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या श्रीलंकन कर्णधाराला होणार अटक!
गोवा नाईटक्लब आगप्रकरणी आरोपी लुथ्रा बंधूना भारतात पाठवले
पश्चिम बंगाल: आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी; ५८ लाखांहून अधिक नावे वगळणार
“पाकिस्तान म्हणजे जागतिक दहशतवादचं केंद्र!”
नेमकं काय घडलं?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री कांदिवली पश्चिम येथील एकतानगरजवळ घडली. ‘नितेश’ आणि ‘एलिया’ नावाच्या दोन व्यक्तींनी ‘अनिल यादव’ यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादव यांनी याची माहिती त्यांचे नातेवाईक ‘शिवम’ यांना दिली. यानंतर नितेश आणि त्याचे मित्र दशरथ कनोजिया, भीम कनोजिया, पप्पू झा आणि विक्की सिंग यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली.
पोलिसांवर हल्ला आणि कुटुंबाचा हस्तक्षेप
दोन गटांमध्ये भांडण आणि मारामारी सुरू असल्याची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भांडणाऱ्या दोन्ही गटांना वेगळे करून संशयित आरोपींना पोलिस व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, आरोपी पप्पू झा याच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि थेट पोलिसांवर हल्ला केला.
या हल्ल्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
पाच जणांना अटक
पोलिसांनी याप्रकरणी गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी पप्पू झा, विक्की सिंग, दशरथ कनोजिया, भीम कनोजिया यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. झा याचे वडील चंद्रकांत, आई सुमन, आणि भाऊ गुड्डू यांनीही पोलिसांच्या कामात अडथळा आणून हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना सोमवारी बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. झा चे पालक आणि भावाला शोधून अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांवर झालेला हा हल्ला अतिशय गंभीर बाब मानली जात आहे.







