मुंबई: अंधेरीतील साकीनाका परिसरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘हेवन टेरेस ७२’ या कॅफेमधून चालणाऱ्या या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी तीन महिलांसह ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका धडाडीच्या व्यावसायिकाने स्वतः ‘डिकोय’ (बळी) बनून केलेल्या पाठपुराव्यामुळे हे रॅकेट उघडकीस आले.
खार येथील ३८ वर्षीय व्यावसायिक पंकज यादव यांच्या मित्राची या कॅफेमध्ये लूट झाली होती. याचा बदला घेण्यासाठी आणि रॅकेट मोडीत काढण्यासाठी यादव यांनी स्वतः मैदानात उतरण्याचे ठरवले. त्यांनी १० दिवस या टोळीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. डेटिंग ॲपवर ३९९ रुपये भरून नोंदणी केल्यानंतर त्यांना एका तरुणीचा मेसेज आला. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल करून त्यांना साकीनाक्यातील ‘हेवन टेरेस ७२’ कॅफेमध्ये भेटायला बोलावण्यात आले.
यादव जेव्हा संबंधित तरुणीला भेटायला कॅफेमध्ये गेले, तेव्हा तिने एकामागून एक अनेक ऑर्डर दिल्या. यादव यांच्या निरीक्षणातून धक्कादायक बाब समोर आली की, तिथे पेयांच्या नावाखाली फक्त पाणी दिले जात होते, मात्र बिल दारूचे लावले जात होते. केवळ काही वेळातच त्यांच्या हातात १८,६१६ रुपयांचे बिल टेकवण्यात आले.
हे ही वाचा:
पश्चिम आशियातील संघर्षात बिटकॉइनची जोरदार कामगिरी
होर्मुझ सामुद्रधुनीजवळील इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेने टाकले ‘बंकर बस्टर’ बॉम्ब
कच्च्या तेलाच्या दरात किंचित दिलासा
कोणत्या धान्याची भाकरी आरोग्यासाठी आहे वरदान?
यादव यांनी तातडीने परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. पवई पोलिसांनी तातडीने पथक तयार केले. यादव पुन्हा एकदा पोलिसांच्या देखरेखीखाली त्या कॅफेमध्ये गेले. तिथे कर्मचाऱ्यांनी आणि बाऊन्सर्सनी त्यांना वाढीव बिल भरण्यासाठी धमकावण्यास सुरुवात केली. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सायंकाळी ६:३५ च्या सुमारास कॅफेवर छापा टाकला.
कॅफेकडे मद्यविक्रीचा कोणताही परवाना नव्हता. तरीही ग्राहकांना पाणी देऊन त्यांच्याकडून दारूचे पैसे उकळले जात होते. बिल भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांना धमकावण्यासाठी तिथे विशेष बाऊन्सर्स तैनात होते. छाप्यावेळी एका ग्राहकाकडून चक्क २५,००० रुपये जबरदस्तीने वसूल केले जात असल्याचे दिसून आले.
अटक करण्यात आलेल्या महिलांनी सांगितले की, दिल्लीतील दोन व्यक्ती त्यांना डेटिंग ॲपवर ‘शिकार’ शोधण्यास मदत करत होत्या.
पोलिसांनी मयूर दिडोले, नितेश अमदास्कर (कॅफे चालक), मयंक कतुरिया (व्यवस्थापक), मोहसीन खान आणि जतीन कुमार (बाउन्सर) यांच्यासह ११ जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून बिलिंग मशीन, बनावट पावत्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.







