महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरसेवक अश्रफ उस्मान पठाण उर्फ ‘शानू पठाण’ विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शानु पठाणच्या या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडत असताना मंचावर उपस्थित असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) पॅनेल क्रमांक ३२ चा विजय झाला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी २७ जानेवारी २०२६ रोजी मुंब्र्यातील अमृतनगर दर्ग्यासमोर ‘जष्न-ए-जीत’ नावाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या व्यासपीठावरून बोलताना नगरसेवक शानू पठाण याची जीभ घसरली. त्याने एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांच्यावर टीका करताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘फलाना’ असा एकेरी आणि अपमानजनक उल्लेख केला, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाझिया हारुण तांबोळी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
हे ही वाचा:
“१ कोटी भारतीयांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता”
चिंता नको, भारताकडे २५ दिवस पुरेल इतका तेलसाठा
नागरिकांना इस्रायल सोडण्यासाठी थेट मदत करता येणार नाही!
प्रकाश आंबेडकर बरळले, होळी आहे, मोदींचा बळी द्या!
या सभेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या चित्रफितीत शानू पठाण महाराजांचा अवमान करत असताना स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील त्याच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. महाराजांचा अपमान होत असतानाही आव्हाड यांनी त्याला रोखले नाही, याबद्दल तक्रारदार नाझीया तांबोळी यांनी तीव्र खेद व्यक्त केला आहे.
मराठी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या…..
भारतीय जनता पक्षाच्या कौसा मंडळ अध्यक्षा नाझिया हारुण तांबोळी यांनी याप्रकरणी पुढाकार घेत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. “आम्ही मुंब्र्यातील मराठी मुसलमान आहोत आणि छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. शानू पठाणने केलेल्या विधानामुळे केवळ हिंदूच नव्हे, तर समस्त मराठी मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत,” असे तांबोळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंब्रा पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत अश्रफ उस्मान पठाण उर्फ ‘शानू पठाण’ विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९९ आणि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सूरज संजय पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







