देशातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून नक्षलवादी नेता माडवी हिडमा एका चकमकीत ठार झाला आहे. तसेच त्याच्या पत्नीसह सहा नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत. मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशातील मारेदुमिल्ली भागात ही कारवाई झाली. शेवटचा श्वास घेत असलेल्या नक्षल चळवळीला माडवी याच्या खात्म्याने आणखी कमकुवत केले आहे.
माहितीनुसार, पोलिस चकमकीत सीसीएमच्या दक्षिण बस्तर बटालियनचा सदस्य हिडमा आणि त्याची पत्नी, इतर चार सुरक्षा रक्षकांसह सकाळी ६:३० ते ७ वाजेच्या दरम्यान ठार झाले. अल्लुरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला हे यश मिळाले. माडवी हिडमाच्या डोक्यावर तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. त्याची हत्या हा या प्रदेशातील नक्षलवादाला मोठा धक्का आहे. चकमकीत सहा माओवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश-छत्तीसगड-ओडिशा सीमेवर माओवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू केली होती.
छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या त्रिकोणी जंक्शनजवळील घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत माडवी हिडमा ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. ग्रेहाउंड्स, डीआरजी आणि सीआरपीएफ कोब्रा युनिट्सच्या संयुक्त कारवाईत तो मारला गेला. हिडमाची पत्नी माधवी आणि बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) च्या चार इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांचाही यात मृत्यू झाला. हिडमाला दोन बायका होत्या, त्या दोघीही चकमकीत मारल्या गेल्याचे वृत्त आहे. सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.
हेही वाचा..
आत्मघाती बॉम्बस्फोट ही एक ‘शहीद मोहीम’ …उमर नबीचा व्हीडिओ आला समोर!
हसीना प्रकरणावरील निर्णयानंतर बांगलादेशात पुन्हा अराजकता; अश्रुधुर, साउंड ग्रेनेड, लाठीमार!
दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवाद्यांनी हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांची आखली होती योजना?
दिल्ली बॉम्बस्फोट: अल- फलाह विद्यापीठासह २४ ठिकाणी ईडीचे छापे
४५ वर्षीय हिडमावर एकूण १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. केंद्र सरकारने त्याच्यावर ४५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर छत्तीसगडने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि इतर राज्यांनीही त्याच्यावर बक्षीस जाहीर केले होते. माडवी हिडमाचा संबंध अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांशी होता, ज्यात २०१० च्या ताडमेटला हत्याकांड आणि २०२१ च्या सुकमा हल्ल्याचा समावेश होता ज्यामध्ये २२ सुरक्षा कर्मचारी मारले गेले होते.







