रविवारी (२५ मे) गाझियाबादमध्ये कादिर नावाच्या एका वॉन्टेड आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना नोएडा पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला. कारवाईदरम्यान, हिंसक जमावाने पोलिसांवर गोळीबार केला आणि दगडफेक केली. पथकाचा भाग असलेले कॉन्स्टेबल सौरभ यांना गोळी लागली आणि नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांचे पथक आरोपी कादिरला अटक करण्यासाठी गाझियाबादमधील मसुरी येथील एका गावात त्याच्या घरी गेले होते. छापा सुरू होताच जमाव आक्रमक झाला आणि दगडफेक करू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई दरम्यान जमावाने गोळीबार केला, ज्यामध्ये नोएडातील फेज-२ पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले कॉन्स्टेबल सौरभ यांना गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या हल्ल्यात २-३ पोलिस कर्मचारीही जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. नोएडाच्या एका उपनिरीक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच, मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. गोंधळ आणि गोळीबाराच्या दरम्यान, आरोपी कादीरने त्याच्या साथीदारांसह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा :
आदित्य ठाकरे यांची टीका नेहमीप्रमाणे बालिश…
पीसीओएसचा महिलांच्या मेंदूवरही होतो परिणाम
जगापेक्षा पाकिस्तानात जास्त दहशतवादी!
दरम्यान, नोएडा पोलिस आयुक्तालयाकडून कॉन्स्टेबल सौरभच्या कुटुंबाला मदत जाहीर करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह हे मदत म्हणून स्वतःच्या पगारातून कॉन्स्टेबलच्या कुटुंबाला १ लाख रुपये वैयक्तिकरित्या देणार आहेत. याव्यतिरिक्त, जिल्ह्यात तैनात असलेले सर्व पोलिस कर्मचारी शोकग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून एक दिवसाचा पगार देणार आहेत.







