मुंबईतील मिठी नदी सफाई प्रकल्पातल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. मेनदीप एंटरप्रायजेसचा मालक शेरसिंह राठोड असं या तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. याआधी जय जोशी आणि केतन कदम यांनाही अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण २०२१-२२ मध्ये बीएमसीने दिलेल्या मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या (D-silting) कंत्राटाशी संबंधित आहे. ठेकेदार कंपन्यांना नदीतील गाळ काढण्याचं काम देण्यात आलं होतं. पण, प्रत्यक्षात गाळ न काढता केवळ ढिगारे (डेब्रिज) उचलून त्याचे खोटे फोटो आणि व्हिडीओ सादर केले गेले.
यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रकचा वापर दाखवून, बनावट बिलं तयार केली गेली. तपासात असंही समोर आलं आहे की, ज्या जमिनीवर गाळ टाकल्याचं दाखवलं गेलं, त्या जमीन मालकासोबतचा सामंजस्य करार (MOU) बनावट होता. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीच्या नावावर हा करार होता, त्यांचं करार होण्यापूर्वीच निधन झालं होतं.
हे ही वाचा:
“रशियन तेल खरेदीत भारत आघाडीवर नाही”
भारत-रशिया संबंध अधिकाधिक पूरक बनवणे हाच हेतू !
खुशखबर!! जीएसटीचे १२ व २८ टक्क्याचे स्लॅब रद्द होणार, ९९ टक्के वस्तू ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये
बनावट कागदपत्रांचा वापर
याशिवाय, कंत्राटदारांनी मशिनरी भाड्याने घेतल्याचं दाखवलं, पण ज्या व्यक्तींकडून ही मशिनरी भाड्याने घेतल्याचं म्हटलं गेलं, त्यांच्याकडे त्यावेळी अशी कोणतीही मशिनरी नव्हती. बनावट करारपत्रे, फोटो आणि इतर रेकॉर्ड सादर करून बीएमसीकडून तब्बल २९.६३ कोटी रुपये वसूल केल्याचंही उघड झालं आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये हे सर्व पुरावे समोर आल्यानंतर शेरसिंह राठोड याला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.







