उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, “दु:ख व्यक्त” केल्यानंतर काही तासांतच क्लबचे मालक सौरोभ आणि गौरव लुथरा थायलंडला पळून गेले. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या दिल्लीतील घरांवर छापे टाकण्यात आले, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली. तिसरा आरोपी भारत कोहलीला दिल्लीहून ताब्यात घेऊन गोव्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ७ डिसेंबरच्या पहाटे ५.३० वाजता लुथरा बंधूंनी मुंबई विमानतळावरून फुकेटला उड्डाण केले. त्यांच्या घरांवर नोटीस लावण्यात आली. गोवा पोलिसांनी तत्काळ लुक-आउट सर्क्युलर जारी करण्याची मागणी केली होती, ज्यामुळे देशातील सर्व विमानतळ व बंदरांना माहिती देण्यात आली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, “घटनेनंतर लगेच देशाबाहेर जाणे म्हणजे चौकशीपासून पळ काढण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे.” ते इंडिगोच्या फ्लाइट 6E-1073 ने गेल्याची पुष्टी इमिग्रेशन ब्युरोकडून मिळाली.
गोवा पोलिस आता सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधून दोघांना पकडण्याच्या तयारीत आहेत. इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नोटिसद्वारे आरोपींचा ठावठिकाणा, हालचाली किंवा तपासासाठी आवश्यक माहिती मिळवली जाते.
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी
बनावट नोटांचा महाघोटाळ्यात कारवाई का झाली नाही?
“अपराधीपणाच्या भावनेमुळेचं प्रियांका वाड्रा, राहुल गांधी सभागृहात अनुपस्थित होते!”
आयसीसीने टीम इंडियावर दंड ठोठावला
अग्निशमन दलाच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष
गोवा अग्निशमन विभागाच्या तांत्रिक अहवालानुसार, मूलभूत अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले गेले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती. आपत्कालीन पथके तात्काळ पोहोचली, परंतु क्लबमध्ये अग्निसुरक्षेची आवश्यक साधने नव्हती आणि परिसरात अनेक अनधिकृत कामे सुरू होती. यामुळे आग अधिक भयानक झाली आणि जिवीतहानी वाढली.
अहवालात म्हटले आहे की, ही घटना अग्निरोधक उपाययोजना, सुरक्षा मानके आणि आपत्कालीन तयारीतील गंभीर अपयश दर्शवते.







