राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमिनीच्या विक्री प्रकरणात आरोपी शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी ही अटक केली. चौकशीत तेजवानीचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने तिला अटक करण्यात आली.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची सरकारी जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवार यांच्या कंपनीवर होत आहे. या प्रकरणात हेमंत गवंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तेजवानी हिने दिलेल्या जबाबाचे अवलोकन करण्यात आले. या प्रकरणात विविध शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तेजवानी हिचा प्रकरणात सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तेजवानी यांची पुणे पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी सलग सहा तास चौकशी केली. ही जमीन महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवानी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ करून घेतली. नंतर २०२५ ला तेजवानी हिने अमेडिया कंपनीबरोबर करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचादेखील प्रयत्न झाला होता.
हे ही वाचा..
मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट
रोहिंग्यांबद्दलच्या टिप्पणीवर तृणमूल खासदार म्हणतात, “न्यायाधीश जास्त बोलतात”
हुमायू म्हणतो, मशीद बांधू द्या, नाहीतर महामार्ग ताब्यात घेऊ!
“बाबरी मशीद बांधण्यासाठी नेहरूंनी सार्वजनिक निधी मागितला होता”
प्रकरण काय आहे?
पार्थ पवार हे अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीत त्यांचे मामेभाऊ आणि आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे चुलत बंधू दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत. या दोघांनी मिळून ही सरकारी जमीन खरेदी केली आहे. सरकारी नियमांना बगल देऊन ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
व्यवहारात सुमारे २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली. केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला. जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या व्यवहाराची फाईल इतक्या वेगाने कशी पुढे सरकली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पुण्यातील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात ही ४० एकर सरकारी जमीन आहे. सर्व सरकारी नियम बाजूला ठेवून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.







