“आय लव्ह मुहम्मद” पोस्टर वादावरून उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आल्या आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या अशांततेनंतर खबरदारीचे उपाय केले जात आहेत. यासाठी प्रशासन कोणतीही कसर सोडत नसून उद्या शुक्रवारच्या नमाजाच्या पूर्वी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच पुन्हा हिंसाचार उसळू नये म्हणून इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
२३ तारखेला घडलेल्या घटनेनंतर तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यानंतर आता नमाजपूर्वी बरेली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाच्या चर्चा केल्या. तसेच पोलिस सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रक्षोभक व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे अलिकडेच झालेल्या दंगली आणि हिंसाचाराच्या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिस कारवाई करत आहेत. पोलिसांनी चकमकीनंतर या प्रकरणात दोन फरार संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची ओळख इद्रिस आणि इक्बाल अशी झाली आहे. संशयितांसोबत पोलिसांची चकमक बरेलीच्या सीबी गंज परिसरात झाली.
हे ही वाचा :
गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त शीख यात्रेकरूंना पाकिस्तानला जाण्याची परवानगी
पीओकेमध्ये हिंसक आंदोलन; पाक सैन्याच्या गोळीबारात १२ ठार!
गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर
… म्हणून ऐश्वर्या- अभिषेक बच्चन यांनी युट्युबकडून ४ कोटींची नुकसानभरपाई मागितली
दरम्यान, बरेलीमध्ये नुकत्याच झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दंगलींमध्ये सहभागी होण्यासाठी बिहार आणि पश्चिम बंगालमधूनही लोकांना बोलावण्यात आले होते. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी तौकीर रझासह ८१ जणांना अटक केली आहे.







