माजी आमदार आणि दिवंगत काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांना आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोहम्मद दिलशाद मोहम्मद नौवेद (३५) याला त्रिनिदाद आणि टोबॅगोमधून अटक केली आहे. इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर नौवेदला मुंबईत आणण्यात आले आहे.
१९, २० आणि २१ एप्रिल रोजी झीशान सिद्दीकी यांना अनेक धमकीचे ईमेल आले होते. या ईमेलमध्ये पाठवणाऱ्याने स्वतःला कुख्यात “डी कंपनी” शी संबंधित असल्याचे सांगितले होते. धक्कादायक म्हणजे, ईमेलमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. १० कोटी रुपयांची मागणी पूर्ण न झाल्यास झीशानला त्याच्या वडिलांसारखेच परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या ईमेलमधून देण्यात आली होती.
सुरुवातीला २१ एप्रिल रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. २३ एप्रिल रोजी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासात असे समोर आले की हे ईमेल त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय आयपी पत्त्यावरून आले होते.
पुढील चौकशीनंतर पोलिसांनी मोहम्मद दिलशाद मोहम्मद नौवेद याचा शोध घेतला.
हे ही वाचा:
अमेरिकेचे भारतासह ७० पेक्षा अधिक देशांवर नवीन टॅरिफ
प्रणिती शिंदे कोणत्या जगात वावरतात ?
‘रमी’ वादाचा फटका? कोकाटे यांची कृषी मंत्रालयातून क्रीडा मंत्रालयात तडकाफडकी बदली!
मायक्रोसॉफ्टमुळे ईस्ट इंडीया कंपनीची आठवण का होतेय ?
तो मूळचा बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील असून सध्या त्रिनिदादमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. २८ एप्रिल रोजी लुक आउट सर्क्युलर (LOC) आणि त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. यावर कारवाई करत, नौवेदला परदेशात ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.
बुधवारी नौवेदला मुंबईत आणण्यात आले आणि सहार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शाखेने त्याला अटक केली. तो सध्या कोठडीत असून, त्याचे कारण आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी त्याचे काही संबंध आहेत का, याचा तपास सुरू आहे.
उल्लेखनीय आहे की, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते ६६ वर्षांचे होते. या घटनेने मुंबईच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली होती. उच्चस्तरीय चौकशीनंतर, मुंबई पोलिसांनी कडक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) २६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.







