नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात राबवण्यात आलेल्या ड्रंक-अँड-ड्राईव्ह कारवाईदरम्यान वरळी येथे घडलेल्या अपघातात वाहतूक पोलीस शिपाई आशिष निघोट जखमी झाले. हा अपघात वरळी येथील एनएससीआय परिसरात लावण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न ताडदेव वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई आशिष निघोट करीत असताना, संबंधित दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत निघोट हे रस्त्यावर कोसळून जखमी झाले.
हे ही वाचा:
पुतिन यांनी ठरवले सैनिकांना ‘नायक’
पंतप्रधान मोदी यांनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा!
अपघातानंतर तातडीने वाहतूक पोलीस शिपाई चंद्रनिलकांत सोनुने यांनी जखमी निघोट यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, संबंधित दुचाकीस्वाराविरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







