काशीमिरा पोलिसांनी बुधवारी रात्री मिरारोड येथील टारझन या डान्स बारवर छापा टाकून अश्लील नृत्य करणाऱ्या १२ मुलींची सुटका केली. या कारवाईत बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांच्यासह २१ ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात डान्स बारवर बंदी असताना ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदा बारवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिले आहेत. त्यानुसार काही दिवसांपासून सातत्याने धाड टाकून गुन्हे दाखल होत आहेत.
मिरारोड येथील नाट्यगृहाशेजारी सुरू असलेल्या टारझन बारमध्ये महिलांकडून अश्लील नृत्य सादर होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळताच पथकाने छापा टाकला. यावेळी ग्राहकांकडून मुलींवर पैशांची उधळण होत असल्याचेही पोलिसांना दिसून आले.
छुप्या खोलीतून सुटका
छाप्यादरम्यान पाच मुलींना लपवण्यासाठी बार मालकाने खास छुपी खोली (‘कॅविटी’) उभारली असल्याचे समोर आले. अशा प्रकारचे बेकायदा बांधकाम रोखण्यासाठी पोलिसांनी पालिकेला पत्र पाठवले असून, सदर बांधकामावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा :
पाकिस्तान तुरुंगाबाहेर इम्रान खानच्या बहिणीवर अंडी फेकली!
मीरा भाईंदर पोलिसांचा हैदराबादमध्ये छापा: १२ हजार कोटींच्या MD ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड!







