राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घालण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामी (जेईआय) या संघटनेशी संबंधित दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात सोमवारी जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी शोधमोहीम राबवली. श्रीनगर आणि शोपिआन जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान अनेक संशयास्पद आर्थिक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ही कागदपत्रे आणि उपकरणे जमात-ए-इस्लामी तसेच जम्मू-काश्मीरमधील तिच्याशी संबंधित विविध ट्रस्ट आणि संस्थांच्या कारवायांशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एनआयए सध्या बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत बेकायदेशीर घोषित करण्यात आलेल्या जेईआयच्या फुटीरतावादी आणि विभाजनवादी कारवायांचा तपास करत आहे. एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, जमात-ए-इस्लामी काश्मीर खोरे आणि देशातील इतर भागांमध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे यामध्ये सक्रियपणे सहभागी होती. ही संघटना आरोग्य आणि शिक्षणासारख्या कल्याणकारी उपक्रमांसाठी देणग्या गोळा करण्याच्या नावाखाली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी उभारत होती.
हे ही वाचा:
एआयएडीएमकेच्या तीन आमदारांचा राजीनामा; टीव्हीके पक्षात केला प्रवेश
जागतिक स्तरावर तेलाच्या किमती घसरल्या तरी भारतात इंधन दरवाढ का?
आसाममध्ये समान नागरी कायदा विधेयक सादर, भाजपशासित तिसरे राज्य
पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण पथकावर गोळीबार; पोलिस कर्मचारी जखमी
तपास यंत्रणेनुसार, हा निधी हिंसक आणि फुटीरतावादी कारवायांसाठी वापरला जात होता. तसेच संघटित नेटवर्कच्या माध्यमातून तो हिजबुल मुजाहिदीन (एचएम) सारख्या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांपर्यंत पोहोचवला जात होता. जमात-ए-इस्लामीच्या कथित कटात काश्मीरमधील तरुणांचे कट्टरपंथीकरण करणे आणि त्यांना फुटीरतावादी कारवायांसाठी नव्या सदस्यांच्या रूपाने भरती करणे याचाही समावेश असल्याचे एनआयएने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी कारवाया आणि सक्रिय दहशतवादी नेटवर्कचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे.
