बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्यांची बहीण अल्विरा खान अग्निहोत्री यांना ‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी शोरूमशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणात चंदीगड जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. न्यायालयाने सलमान, अल्विरा तसेच स्टाईल अँड कंटेंट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांना ५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून आरोपांवर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित प्रकरण चंदीगडमधील मनीमाजरा येथील व्यावसायिक अरुण गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. गुप्ता यांचा आरोप आहे की, ‘बिइंग ह्यूमन’ ज्वेलरी शोरूम सुरू करण्यासाठी त्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. ब्रँडकडून व्यवसायासाठी पूर्ण सहकार्य, जाहिरात आणि आवश्यक सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांनी मोठी गुंतवणूक केली. मात्र, वचनाप्रमाणे सहकार्य न मिळाल्याने आणि व्यवसायाला अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, करार झाल्यानंतरही व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक उत्पादने, विपणन आणि ब्रँडकडून अपेक्षित मदत मिळाली नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने तक्रारीची दखल घेत समन्स जारी केले.
हे ही वाचा:
“अटक झाली तरी मायदेशी परतणार” काय म्हणाल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान?
८८ कोटींच्या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या पत्नीला यूएईतून आणले भारतात
शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होताच शाकिब यांच्या घरावर हल्ला
ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?
विशेष म्हणजे, याच प्रकरणात २०२१ मध्ये चंदीगड पोलिसांनी सलमान खान, अल्विरा खान आणि इतर संबंधितांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यावेळी ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित कंपनीने स्पष्टीकरण देत सलमान खान आणि अल्विरा यांचा कंपनीच्या दैनंदिन व्यावसायिक व्यवहारांशी थेट संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने समन्स बजावल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यावेळी सलमान खान, अल्विरा खान आणि इतर आरोपी न्यायालयात आपली भूमिका मांडणार आहेत.
