२७ फेब्रुवारी रोजी लोनी येथे यूट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना चकमकीत ठार केले आहे. इंदिरापूरम परिसरात झालेल्या एन्काऊंटरमध्ये गुलफाम नावाच्या दुसऱ्या आरोपीचा मृत्यू झाला. यापूर्वी मुख्य आरोपी जीशान यालाही पोलिस चकमकीत ठार करण्यात आले होते. दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीच्या सकाळी लोनी परिसरात सलीम वास्तिक यांच्या कार्यालयात दोन हल्लेखोर घुसले. त्यांनी धारदार शस्त्राने सलग ६ ते ७ वार केले. हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर वार करत गळा चिरण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. गंभीर जखमी अवस्थेत सलीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या सलीम वास्तिक यांच्यावर दिल्लीतील गुरू तेगबहादूर हॉस्पिटलमध्ये येथे उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे. गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीशान हा एक लाख रुपयांचा इनामी आरोपी होता. त्यानंतर त्याचा भाऊ गुलफाम हाही पोलिस कारवाईत ठार झाला. गेल्या ४८ तासांत दोन्ही आरोपींचा शेवट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
युद्धाच्या भीतीने रुपया घसरला; डॉलरसमोर ९२ चा टप्पा पार
गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये तब्बल ७ टक्क्यांपर्यंत घसरण
पाकिस्तानी घुसखोराला मोबाईल फोन, सिम कार्डसह अटक
‘तिने’ सुरू केली घरगुती मदतीसाठी कंपनी; ८०० कोटींची उलाढाल
स्थानिक रहिवाशांच्या मते, सलीम वास्तिक मागील सुमारे ८ महिन्यांपासून लोनीच्या अली गार्डन भागात राहत होते. त्यांच्या घराबाहेर सलीम वास्तिक असा फलक लावलेला आहे आणि घराच्या छतावर तिरंगा ध्वज फडकत असल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून पुढील चौकशी सुरू आहे. सध्या घराला कुलूप लावण्यात आले आहे आणि बाहेर त्यांची गाडी उभी असल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.







