नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देश सज्ज झाला असताना, मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था उभी केली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत धार्मिक कार्यक्रमांसह सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स आणि विविध पार्टी स्थळांवर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली संपूर्ण शहरासाठी विशेष सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरिकांना कोणताही त्रास किंवा भीती न वाटता नववर्षाचे स्वागत करता यावे, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
हे ही वाचा:
दुषित पाणी पिल्याने सात जणांचा मृत्यू; १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
स्विगी आणि जोमॅटोने डिलिव्हरी इन्सेंटिव्ह वाढवले
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात भक्कम सुरक्षा कवच उभारण्यात आले असून, १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३८ पोलीस उपायुक्त, ६१ सहाय्यक पोलीस आयुक्त, २,७९० पोलीस अधिकारी आणि १४,२०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय एसआरपीएफ तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम्स (QRT), बॉम्ब शोध व नाशक पथके (BDDS), आरसीपी तुकड्या आणि होमगार्ड्स संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती देताना डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले की, “३१ डिसेंबरच्या रात्री शहरातील विविध भागांत नाकाबंदी करण्यात येणार आहे. प्रमुख चौक, पर्यटनस्थळे आणि पार्टी हॉटस्पॉट्स येथे पोलीस गस्त वाढवण्यात येईल. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी निश्चित ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.”
मुंबई पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करून शांतता व उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा मदतीसाठी नागरिकांनी तात्काळ १०० किंवा ११२ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







