गुरुवारी (७ ऑगस्ट) कॅनडामधील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला. मागील महिन्यात असाच गोळीबार झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणारा गँगस्टर गोल्डी ढिल्लनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मिडीयावर तशी पोस्ट त्याने केली आहे.
“जय श्री राम. सर्व बांधवांना सत श्री अकाल, राम राम. कपिल शर्माच्या सरे येथील कॅप्स कॅफेमध्ये आज झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लन, लॉरेन्स बिश्नोई टोळी घेत आहे. आम्ही त्याला फोन केला होता, पण त्याने कॉलला उत्तर दिले नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याने तरीही प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही लवकरच मुंबईत पुढील कारवाई करू,” असे गोल्डी ढिल्लनने पोस्टमध्ये म्हटले.
या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कॅफेजवळील एका चालत्या वाहनातून अनेक गोळ्या झाडल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सरे पोलिस सेवेने (एसपीएस) घटनेची पुष्टी केली आणि एक निवेदन जारी केले ज्यामध्ये अधिकारी घटनेची चौकशी करत असल्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा :
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या
भारतासोबत व्यापार चर्चेला डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार!
भारताच्या टी-२० आणि कसोटी संघात श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाची शक्यता
रा.स्व.संघ शताब्दी वर्ष विशेषांक… २०२५ |
कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर मागील महिन्यात ९ जुलै रात्री उशिरा हल्ला झाला होता. त्यावेळी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सूचीबद्ध केलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी लड्डी हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या गटाशी संबंधित आहे.








