लेहमध्ये सुरू असलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर यात चार जणांचा मृत्यू झाला. तर, ७० हून अधिक जण जखमी झाले. हिंसाचाराला हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला. यानंतर शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) अटक करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी करणाऱ्या निदर्शकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
लेह येथे झालेल्या हिंसक निदर्शनांच्या प्रकरणात सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली. संतप्त निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ केली. निदर्शकांनी भाजप कार्यालयही जाळले. या हिंसाचारानंतर, केंद्र सरकारने गुरुवारी सोनम वांगचुक यांच्या एनजीओ, स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) चा परदेशी निधी परवाना रद्द केला. तर, सोनम वांगचुक यांना आता अटक करण्यात आली आहे. एनजीओसाठी परदेशी निधी प्राप्त करण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा वांगचुक यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत.
हे ही वाचा:
मिग- २१ सोबत अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची आहे खास आठवण!
न्यूयॉर्कमध्ये झळकतायत “Remember October 7” लिहिलेले होर्डिंग्ज! नेमके प्रकरण काय?
गौरवशाली अध्यायाचा अंत: ६२ वर्षांच्या सेवेनंतर लढाऊ मिग- २१ विमानांना निरोप
पाकची नाचक्की; ट्रम्पनी शरीफ, मुनीरना गेटबाहेर ठेवले ताटकळत
सोनम वांगचुक हे बऱ्याच काळापासून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. १० सप्टेंबर पासून त्यांनी उपोषण सुरू केले होते. परंतु, बुधवारी झालेल्या हिंसाचारात तरुण निदर्शकांनी पोलिस आणि स्थानिक भाजप कार्यालयावर हल्ला केला. गृह मंत्रालयाने आरोप केला आहे की, वांगचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळ जनरल झेड निदर्शनांचा उल्लेख केल्याने जमावाचा रोष निर्माण झाला ज्यामुळे लेहमधील स्थानिक भाजप कार्यालय आणि काही सरकारी वाहने जाळण्यात आली.







