सांताक्रूझ पूर्व येथील कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी एका तरुणीवर आणि तिच्या पालकांवर छळ व धमक्यांचे गंभीर आरोप केले असून, वाकोला पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृताची ओळख भैय्यासाब मारुती व्हावले (वय ३२) अशी असून ते परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खडगाव येथील रहिवासी होते. नुकतीच त्यांची मुंबई पोलिस दलात चालक म्हणून भरती झाली होती आणि ते कलिना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होते. त्यांच्या भरतीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी सकाळी प्रशिक्षण केंद्रातून फोन करून भैय्यासाब यांचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. तातडीने मुंबईकडे धाव घेतलेल्या कुटुंबीयांना नंतर वाकोला पोलिसांकडून आत्महत्येची माहिती मिळाल्याने धक्का बसला.
दरम्यान, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली असून ती भैय्यासाब यांच्या हस्ताक्षरातील असल्याचा दावा करण्यात येत आहे. या नोटमध्ये त्यांनी ‘दिव्या’ नावाच्या तरुणीला व तिच्या आई-वडिलांना आपल्या मृत्यूस जबाबदार धरले आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि विवाहाची तयारी सुरू होती, मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला होता, असा उल्लेख नोटमध्ये आहे. याशिवाय, तरुणीच्या वडिलांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा तसेच नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याचा आरोपही नोटमध्ये करण्यात आला आहे. सततच्या मानसिक दबावामुळे आपण खचल्याचेही त्यांनी नमूद केल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
होर्मुझ सामुद्रधुनीजवळील इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेने टाकले ‘बंकर बस्टर’ बॉम्ब
अदानी समूहाला जयप्रकाश असोसिएट्स अधिग्रहणासाठी NCLT ची मंजुरी
खरोखरच ममतांचा हिशोब होणार काय ?
“ईडनचा चमत्कार! गांगुलीही म्हणाला—‘हे नशिब होतं!’”
मृताचे वडील भीमराव व्हावले यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत भैय्यासाब यांना वारंवार धमकीचे फोन येत होते. ही घटना प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या राहत्या खोलीत घडल्याचे समजते. पोलिसांनी सुसाईड नोट न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवली असून संबंधित व्यक्तींच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) तपासले जात आहेत. धमक्यांचा आरोप कितपत खरा आहे, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.







