मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटने (CIU) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात आश्रमाबाहेर झालेल्या बॉम्बहल्ला प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मुंबईतील बोरीवली येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
क्राइम ब्रांचच्या माहितीनुसार, हा गुन्हा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही काळातच ही घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख रोकी खान (२४) आणि सहादत सरकार (३५) अशी झाली आहे. रोकी खान हा कांडी हॉटेल पारा येथील रहिवासी असून व्यवसायाने चालक आहे, तर सहादत सरकार हा नतुन पुरा गावातील रहिवासी असून मजूर म्हणून काम करतो.
पोलीसांच्या माहितीनुसार, माजीहेरपाडा पोस्ट ऑफिस परिसरातील किराणा दुकानदार पशुपतिनाथ साहा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत त्यांनी अली हुसेन उर्फ लादेन, हसन एसके आणि त्यांच्या अन्य तीन अज्ञात साथीदारांवर या घटनेत सहभागी असल्याचा आरोप केला असून ते अद्याप फरार आहेत.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, १२ मे रोजी काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाजवळील माँ दुर्गा मंदिरासमोरील वीज खांबावरील फोटो फाडले होते. त्यानंतर १३ मे रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजता आरोपींनी आपल्या साथीदारांसह आश्रमासमोरील मोकळ्या मैदानात सॉकेट बॉम्ब फेकले. त्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच शांतता भंग झाली. पुढील दिवशी १४ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता आरोपी मोटारसायकलवरून दुकानाबाहेर आले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास पुन्हा बॉम्बहल्ला करण्याची धमकी तक्रारदाराला दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींचा ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार – कमांडर ग्रँड क्रॉस’ पुरस्काराने सन्मान
माहिती आहे का? ३.५ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर आली होती भीषण महापूरस्थिती
३० वर्षे जपानमध्ये…१८ वर्षे चालवलेले रेस्तराँ बंद करून यावं लागणार भारतात!
“बेकायदेशीर मध्यस्थता मान्य नाही” सिंधू जल करारावर भारत ठाम
या प्रकरणी पोलिसांनी १५ मे रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी अटकेपासून बचाव करण्यासाठी घर सोडून गीतांजली एक्सप्रेसने मुंबईला पळून गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई क्राइम ब्रांचला याबाबत माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे CIU च्या पथकाने बोरीवली रेल्वे स्थानकावर सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर मुंबई क्राइम ब्रांचने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली असून आरोपींना पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली आहे.
