केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय)ने उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील लाचखोरीच्या प्रकरणात टपाल विभागातील दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोंच उपविभागीय टपाल कार्यालयाचे उपविभागीय निरीक्षक प्रतीक भार्गव आणि चंदुर्रा टपाल कार्यालयाचे शाखा टपालमास्तर अमीर हसन यांचा समावेश आहे. सीबीआयने या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडून १६ डिसेंबर रोजी अटक केली.
हे प्रकरण एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून समोर आले असून तक्रारदार स्वतः टपाल विभागातील कर्मचारी आहे. त्याची बदली झाली होती, मात्र त्याला रिलीव्ह करण्यात येत नव्हते. तसेच ऑक्टोबर महिन्याचा पगार मंजूर केला जात नव्हता आणि त्याच्या जात प्रमाणपत्राच्या पुनर्तपासणीचा मुद्दाही प्रलंबित ठेवण्यात आला होता. ही कामे करून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. आरोपानुसार, उपविभागीय निरीक्षक प्रतीक भार्गव यांनी आधीच धमकी देऊन व दबाव टाकून तक्रारदाराकडून ५ हजार रुपये उकळले होते.
हेही वाचा..
पंतप्रधानांना सर्वोच्च सन्मान मिळणे अभिमानास्पद
मोदींच्या ओमान दौऱ्याचे फलित काय ?
अबू धाबीत भारत–यूएई संयुक्त लष्करी सराव
काँग्रेसला बघवत नाही भारतीय सैन्याचा पराक्रम!
यानंतर चर्चा होऊन लाचेची रक्कम कमी करून १२ हजार ५०० रुपयांवर सहमती झाली. या दरम्यान प्रतीक भार्गव यांनी अतिरिक्त २ हजार ५०० रुपयेही घेतले. उर्वरित ५ हजार रुपयांसाठी सीबीआयने १६ डिसेंबर रोजी सापळा रचला. दोन्ही आरोपी तक्रारदाराकडून ही रक्कम मागताना आणि स्वीकारताना आढळताच सीबीआयच्या पथकाने त्यांना घटनास्थळीच पकडले. दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाचा तपास १५ डिसेंबर रोजी तक्रार प्राप्त होताच सुरू केला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एजन्सीने ट्रॅप ऑपरेशन राबवले. अटकेनंतर तपास सुरू असून या प्रकरणात इतर कोणाची भूमिका आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.







