अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील नामांकित क्रीडा आणि सामाजिक क्लबांवर मोठी कारवाई केली आहे. तपासणीत झुरळांचा व माशांचा प्रादुर्भाव, कालबाह्य अन्नपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकगृहे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आल्यानंतर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI), आरके जुहू जिमखाना, द अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांच्या FSSAI अन्न परवान्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच मालाड पश्चिम येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला वैध परवान्याशिवाय अन्न व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी तातडीने सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीएने २७ जुलै रोजी बृहन्मुंबईतील सात क्लब, कँटीन आणि रेस्टॉरंट्सची विशेष तपासणी मोहीम राबवली होती. या तपासणीत पाच संस्थांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले, एका संस्थेला तातडीने अन्न व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले, तर आणखी एका संस्थेला त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली. ही मोहीम राज्यभर सुरू असलेल्या अन्नसुरक्षा तपासणी अभियानाचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील तपासणीत सर्वाधिक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अन्न हाताळण्याच्या ठिकाणी जिवंत झुरळे आणि माशांचा प्रादुर्भाव, कोल्ड स्टोरेजमधील अन्नावर पाणी गळणे, साचलेले सांडपाणी, तुंबलेली गटारे, खराब झालेल्या भाज्या आणि कालबाह्य अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे निरीक्षण करण्यात आले. तसेच अन्नपदार्थांवर योग्य लेबलिंग नसणे, FIFO (First In, First Out) आणि FEFO (First Expiry, First Out) पद्धतींचे पालन न करणे, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे आणि त्यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचेही निदर्शनास आले.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये अस्वच्छ व घसरडे मजले, खराब झालेल्या भिंती व छत, निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळले. आरके जुहू जिमखानामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छता सुविधा नसणे, कच्चे अन्न योग्य प्रकारे स्वच्छ न करणे आणि हातमोजे, कॅप किंवा अॅप्रनचा वापर न करणे अशा त्रुटी आढळल्या. द अपर्णा जुहू जिमखानामध्ये गंजलेली स्वयंपाकाची उपकरणे, अन्नसुरक्षेसाठी अयोग्य पॅकेजिंग साहित्य, शिजवलेले आणि कच्चे तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्न वेगळे न ठेवणे आणि स्वयंपाकघरात माशांचा प्रादुर्भाव आढळला.
हे ही वाचा:
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलक भारतासारखेच शत्रू!
सरकारी वाहनांच्या वापरावर केंद्राची नवी शिस्त; ‘वन ऑफिसर, वन कार’ नियम
‘दगडांनी भरलेला ट्रक’ कट नव्हे; महापालिकेच्या कामासाठीच होता
वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!
बांद्रा पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये एम/एस नेब्युला केटरिंग सर्व्हिसेस ही संस्था वैध FSSAI परवान्याशिवाय अन्न सेवा देत असल्याचे तपासणीत समोर आले. याशिवाय झुरळांचा प्रादुर्भाव, कच्चे आणि शिजवलेले अन्न अयोग्य पद्धतीने साठवणे, अन्न व पाण्याच्या नियमित चाचण्या न करणे, प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय व लसीकरण नोंदी न ठेवल्याचेही आढळले. तसेच परवाना प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता अन्न व्यवसायाचे ठिकाण आणि व्यवस्थापनात बदल केल्याचेही एफडीएच्या निदर्शनास आले.
मालाड पश्चिम येथील गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये आवश्यक अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी नसतानाही अन्न सेवा सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके (परवाना व नोंदणी) नियम, २०११ चे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनाला तात्काळ अन्न व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
