पाकिस्तानी दहशतवादी सैफुल्ला कसुरीच्या एका नवीन व्हिडिओमधून असे दिसून आले आहे की, तो भारतावर समुद्री दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्यांमध्ये सैफुल्ला कसुरी हा देखील आहे. तो कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या संघटनेचा, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) एक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याची आठवण करून देत, त्याने इशारा दिला आहे की, भारतावर २६/११ सारखा आणखी एक हल्ला समुद्रमार्गे केला जाईल. सीएनएन न्यूज१८ ने यासंबंधी वृत्त दिले आहे.
लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरीचा व्हिडिओ समोर आला असून ज्यामध्ये तो भारताविरुद्ध उघड धमक्या देत आहे. पाकिस्तानच्या कथित लष्करी वर्चस्वाचे कौतुक करत आहे. व्हिडिओमध्ये, कसुरी दावा करतो की, पाकिस्तानने २०२५ मध्ये “हवेवर वर्चस्व गाजवले” होते आणि २०२६ मध्ये “समुद्रावर वर्चस्व गाजवेल.”
वृत्तानुसार, सैफुल्ला कसुरी दहशतवादी हल्ल्याचे वर्णन अल्लाहची इच्छा असल्याचे करतो आणि पाकिस्तान लवकरच सर्व धोरणात्मक क्षेत्रांवर नियंत्रण मिळवेल अशी प्रतिज्ञा करत आहे. ही विधाने २६/११ च्या मुंबई हल्ल्यांसारख्या सागरी हल्ल्याची पूर्वसूचना असल्याचे बोलले जात असून या हल्ल्याची योजना २००८ मध्ये लष्कर-ए-तैयबाने आखली होती आणि अरबी समुद्रातून अंमलात आणली गेली.
हे ही वाचा:
२०२८ पर्यंत भारताला मिळणार पहिले स्वदेशी मरीन इंजिन!
पवन हंस हेलिकॉप्टरचे अंदमानच्या समुद्रात क्रॅश-लँडिंग
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे कॅनडीयन नागरिकत्व होणार रद्द
सततच्या ‘खुदाई’ने गोराईकर संतापले! कोट्यवधींचा रस्ता पुन्हा खोदला
व्हिडिओमध्ये कसुरी उघडपणे सांगत आहे की, त्याला पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा आहे. तो पाकिस्तानी लष्कराशी समन्वय साधून काम करत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये पसरलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओचा उद्देश कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आहे असे मानले जात आहे.







