दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा आणि गोगी हिमांशू भाई या कुख्यात टोळ्यांशी संबंधित असलेल्यांना चीन आणि तुर्की बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येत होता.
माहितीनुसार, पाकिस्तानच्या आयएसआयशी जोडलेले हे रॅकेट दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमधील गुंडांना चीन आणि तुर्कीमध्ये बनवलेली उच्च दर्जाची शस्त्रे पुरवत असे. ड्रोनच्या मदतीने हे खेप पंजाबमार्गे भारतात येत असत आणि तेथून टोळ्यांना शस्त्रे पुरवली जात असत. या प्रकरणासंदर्भात रोहिणी येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून उच्च दर्जाच्या पिस्तूलांसह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
दिल्लीत शस्त्रे पुरवण्यासाठी तस्कर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रोहिणी परिसरात छापे टाकले. “दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय द्वारे चालवल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र टोळीचा पर्दाफाश केला आहे. एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे आणि १० अत्याधुनिक पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. यातील पाच पिस्तूल तुर्कीमध्ये बनवल्या होत्या आणि उर्वरित चीनमध्ये बनवल्या होत्या,” असे पोलिस आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, चार आरोपींपैकी दोघांना, फिल्लौर येथील मनदीप आणि लुधियाना येथील दलविंदर यांना रोहिणी येथील एका व्यक्तीला शस्त्रे पोहोचवण्यासाठी जात असताना अटक करण्यात आली.
हे ही वाचा:
“राष्ट्राच्या हितासाठी एकमेकांना सहकार्य करा!” शशी थरूर यांनी कोणाला दिला सल्ला?
काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत
मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा
कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी
पुढे या दोघांच्या चौकशीदरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकण्यात आले आणि आणखी दोन शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तिसरा व्यक्ती रोहन तोमर आहे, जो उत्तर प्रदेशातील बागपतचा रहिवासी आहे आणि अटक करण्यात आलेल्या चौथ्या व्यक्तीची ओळख अजय उर्फ मोनू म्हणून झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
