मुंबईतील एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या ६ महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. महिलेच्या हत्येमागे तिचा दुर्धर आजार आणि बिकट आर्थिक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.
गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेने तिच्या ६ महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या दुर्धर आजारामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे गांजलेल्या या मातेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गुरुवारी दुपारी पाळण्यात झोपलेल्या बाळाचा गळा दाबून खून केल्याची कबुली महिलेने दिली. त्यानंतर तिने स्वतःच्या आयुष्याचाही शेवट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच ती टिळक नगर पोलिसांच्या हाती लागली. टिळक नगर पोलिसांनी एका महिलेला चाकूने मारण्याच्या आरोपाखाली तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गोवंडी येथील घरी आपल्या बाळाची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर टिळक नगर पोलिसांनी शिवाजी नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा:
कर्नाटक: पगार १५ हजार, मालमत्ता ३० कोटींची, माजी लिपिकाला अटक!
माजी जेडी(एस) खासदार प्रज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी!
रुग्णालयात उंदराने रुग्णाला कुरतडलं
Ganpati Special Train: एलटीटी – मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन
शिवाजी नगर पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन तपास केला असता, त्यांना पाळण्यात बाळाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिक चौकशी केली असता, महिलेने तीन विवाह केले होते, पण तिन्ही पतींनी तिला सोडून दिले होते. त्यानंतर ती एका पुरुषाच्या संपर्कात आली, ज्याच्यापासून तिला बाळ झाले. पण तो पुरुषही तिला सोडून गेला.
६ महिन्यांपूर्वी बाळंत झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला दुर्धर आजार झाल्याचे समजले. आधीच आर्थिक परिस्थितीमुळे हतबल झालेल्या महिलेला उपचारांचा खर्च पेलवणे शक्य नव्हते. यामुळेच हताश होऊन तिने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







