सततच्या छळाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने स्वतःच्या वडिलांचा व आजोबांचा गळा चिरून खून केला, तर काकाला जखमी केले. ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री अंधेरी (पूर्व) येथील तक्षशीला इमारतीजवळील संतोषी माता चाळीत घडली.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी चेतन भात्रे हा मेडिकल दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तो घरी परतल्यानंतर वडील मनोज (५७), आजोबा बाबू (७९) आणि काका अनिल (५४) या तिघांसोबत वाद झाला, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वडिलांच्या वादाला कंटाळून चेतनने स्वयंपाक
घरातून चाकू आणला आणि एकामागून एक तिघांवर हल्ला चढवला, या हल्लात वडील व आजोबांचा जागीच मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी होऊन त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर चेतनने रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन थेट तक्षशीला इमारतीजवळील पोलिस बीट चौकीत हजर होत आत्मसमर्पण केले. तेव्हा उपस्थित असलेले पोलिस शिपाई संजय भालेराव, विजय देवरे व सुहास नेवासे यांनी तत्परतेने त्याला शांत करत ताब्यात घेतले व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली.
चौकशीत चेतनने सांगितले की, वडील, आजोबा आणि काका हे तिघेही दारूचे आहारी गेलेले असून सतत भांडणे काढत.
हे ही वाचा :
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब तर आदित्य ठाकरेंचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
पंतप्रधान मोदींची राजस्थानला ₹१.२२ लाख कोटींच्या प्रकल्पांची भेट!
“भारतासोबत समस्या आहे कारण…” मुहम्मद युनूस भारताबद्दल पुन्हा बरळले
लहानपणापासून चालत आलेल्या या छळामुळे आईने घर सोडले होते. तसेच तिघेही त्याच्याकडून आणि बहिणीकडून मिळवलेल्या पैशांचा गैरवापर करत असल्याचा त्याचा आरोप आहे. या हत्याकांड प्रकरणी आरोपी चेतन भात्रे याच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.







